|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती!

आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती! 

जिल्हय़ाच्या शाश्वत विकासासाठी सतत प्रयत्न – केसरकर : मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे सावंतवाडीत भूमिपूजन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

विकास ही जादूची कांडी नाही. विकास होण्यासाठी काही वर्षे जावी लागतात. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी दहा वर्षं लागली. त्यामुळेच माझा सावंतवाडीचे आधुनिक शिल्पकार म्हणून काहीजण गौरव करीत होते. परंतु मी स्वत:ला कधीही आधुनिक शिल्पकार मानले नाही. लोकांची सेवा हीच ईश्वरसेवा हे तत्त्व मानून मी काम केले. लोकांचे अश्रू पुसण्याचे काम माझ्याकडून सातत्याने घडो, अशी करुणा मी ईश्वराकडे भाकली. मला आधुनिक शिल्पकार म्हणणाऱयांची स्मृती आज विस्मृतीत गेली आहे. लोकांची सेवा करूनच त्याला उत्तर देऊ, असे प्रतिपादन जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सावंतवाडीत 36 कोटी रुपयांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन केसरकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात केसरकर बोलत होते. हे रुग्णालय 11 महिन्यांत पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास व्यक्त करताना आतापर्यंत जिल्हय़ातील लोकांना आरोग्य सेवेसाठी गोव्याला जावे लागत होते. परंतु हे रुग्णालय झाल्यानंतर गोव्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतील, असा दावाही त्यांनी केला.

व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकुरकर, वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, पांडुरंग निकम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य, नागेंद्र परब, अशोक दळवी, नितीन शिरोडकर, वेंगुर्ले सभापती मोरजकर, विक्रांत सावंत, राजू मसुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात आमुलाग्र क्रांती

सिंधुदुर्ग जिल्हय़ात आरोग्याच्या बाबतीत समस्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले. वेंगुर्ले, दोडामार्ग, देवगड येथे नवीन रुग्णालये मंजूर केली. सावंतवाडीतही हे रुग्णालय मंजूर केले. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती होणार आहे. त्याचा लाभ जिल्हय़ातील लोकांना होणार आहे. जिल्हय़ात सध्या असलेली रुग्णालये आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाला एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या रुग्णालयातही रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ

सिंधुदुर्ग जिल्हा पाच वर्षांपूर्वी अशांत होता. सातत्याने राडा होत होता. त्यामुळे जिल्हय़ाची बदनामी होऊन विकासावर परिणाम होत होता. परंतु गेल्या पाच वर्षांत जिल्हय़ात शांतता आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशी शांतता निर्माण झाल्यास जिल्हय़ातही मोठय़ा प्रमाणावर डॉक्टर रुजू होतील, असे सांगून केसरकर म्हणाले, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. मला दिखावू विकासापेक्षा शाश्वत विकास पाहिजे. जनतेच्या आशीर्वादाने हा शाश्वत विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जिल्हय़ात अनेक विकासकामे आणली. मातृ ऋण मानून हे मी काम करतो. जिल्हय़ात विकासाची प्रक्रिया सुरू असताना यंदा अतिवृष्टीमुळे पूर आला. त्यात जनतेचे नुकसान झाले. पूरग्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी मी गेला महिनाभर त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना लागणारी मदत पोहोचवली. त्यात कुठेही कमी पडलो नाही. हे करीत असताना विकास प्रकल्पांची उद्घाटने, भूमिपूजने थांबली. परंतु मी प्रथम पूरग्रस्तांना प्राधान्य दिले. आज सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोनोरेल, तारांगण, म्युझियम सेंटर आदी प्रकल्प आणले. रघुनाथ मार्केटमध्येही लवकरच हस्तकला केंद्र सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात मच्छींद्रनाथ कांबळी, शिवरामराजे भोसले यांची स्मारके होणार आहेत. ही स्मारके सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न आहे. शिवरामराजे भोसले यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी कॉलेज स्थापन केले होते. त्याचा लाभ जिल्हय़ातील हजारो विद्यार्थ्यांना झाला. सावंतवाडी संस्थानच्या अनेक जमिनींवर शासकीय इमारती उभ्या आहेत. या जमिनी शासनाला मिळवून देतानाच या जमिनींचा सर्व मोबदला राज्यघराण्याला अदा करण्यात येईल. त्या संदर्भात राज घराण्याशी चर्चा सुरू आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

मराठा समाजासाठी हॉस्टेल

शिवरामराजे भोसलेंचे स्मारक उभारताना मराठा समाजासाठी हॉस्टेल उभारण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे. लोकांच्या सेवेसाठी मी सातत्याने देवाकडे प्रार्थना करीत असतो. त्यामुळे मला बळ मिळत असते, असे सांगतानाच केसरकर भावूक झाले.

50 हजाराच्या मताधिक्याने केसरकर विजयी होतील

खासदार विनायक राऊत म्हणाले, केसरकर यांनी जिल्हय़ाच्या विकासासाठी महत्त्वाचे काम केले. जिल्हय़ाचे आरोग्य बिघडत असताना ते देवदूत म्हणून पुढे आले. जिल्हय़ाच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम लक्षात घेता ते येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने 50 हजाराच्या मताधिक्याने ते निवडून येतील, हे भविष्य सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाच्या कुंडलीची गरज नाही. तुम्हीच त्यांचे देव आहात. त्यांच्यावर कुठल्याही नवग्रहांची कुंडली चालणार नाही, असा टोलाही राऊत यांनी हाणला. वेंगुर्ले येथे रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हय़ातील लोकांसाठी सुसज्ज रुग्णालय देण्याची ग्वाही दिली होती. ठाकरे यांचे स्वप्न मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असेही ते म्हणाले.

अन्नपूर्णा कोरगावकर यांनी मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय उभारताना सध्याच्या रुग्णालयात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत डॉ. धनंजय चाकुरकर यांनी केले. यावेळी चाकुरकर, उत्तम पाटील, डॉ. संदीप सावंत, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. वजराठकर, डॉ. सागर जाधव, राजू मसुरकर यांचा रुग्णसेवा करीत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, आनारोजीन लोबो, अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, मंगेश तळवणेकर, खासदार विनायक राऊत यांची कन्या रुची राऊत, उमा वारंग, सुदन्वा आरेकर, बांधकाम अधिकारी राजन चव्हाण आदी उपस्थित होते.

Related posts: