|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अमित सामंत 

प्रतिनिधी / कुडाळ:

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी धडाडीचे पदाधिकारी व संघटक अमित सामंत यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या सामंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पुन्हा जोमाने उभारी घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून पक्षवाढीसाठी त्यांनी काम केल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जाते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सामंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे अभिनंदन केले.

1996 पासून सामंत यांनी काँग्रेसच्या एनएसयूआय संघटनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. युवक काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रवादीची 1999 मध्ये स्थापना झाल्यानंतर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गातील विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले. राष्ट्रवादी युवक राज्य सरचिटणीस म्हणून काम केले. चांगले संघटक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रदेश चिटणीस तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत असताना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध आंदोलनांसह विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी ते नेहमी सक्रिय राहिले. पक्ष संघटना वाढविण्यासाठी ते कार्यरत असून विविध संस्थांमार्फत आरोग्यविषयी मदत देऊन अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या निवडीनंतर सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.