|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पवार-सोनिया गांधींमध्ये आघाडीसाठी खलबते

पवार-सोनिया गांधींमध्ये आघाडीसाठी खलबते 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊणतासापेक्षा जास्त काळ चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच संदर्भात सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षाची साथ सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आघाडींच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत. बहुतांशी जागांबाबत एकमत झाले असून, अनेक जागांबाबत निर्णय होणे बाकी आहे.