|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » सैफुद्दिनचे पुनरागमन, मेहदी हसनला डच्चू

सैफुद्दिनचे पुनरागमन, मेहदी हसनला डच्चू 

तिरंगी टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर : शुक्रवारी झिम्बाब्वेविरुद्ध सलामीचा सामना

ढाका / वृत्तसंस्था

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी क्रिकेट निवड समितीने देखील युवा खेळाडूंना संधी देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून येथे खेळवल्या जाणाऱया तिरंगी टी-20 मालिकेसाठी बांगलादेशने संघ जाहीर करताना अष्टपैलू मोहम्मद सैफुद्दिनला संधी दिली तर ऑफस्पिनर मेहदी हसनला 13 सदस्यीय संघातून डच्चू दिला. गतवर्षी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया अफिफ होसेनचे येथे पुनरागमन झाले असून याचवेळी यीसिन अराफत या नव्या जलद गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे.

सैफुद्दिनला आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाठीची दुखापत झाली व त्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकलेला नाही. बांगलादेश निवड समितीचे अध्यक्ष मिन्हाजूल अबेदिन यांनी येथे 22 वर्षीय सैफुद्दिन पूर्ण तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा दिला.

लंकेविरुद्ध वनडे मालिकेत केवळ दोन बळी घेणाऱया मेहदी हसनला येथे डच्चू देण्यात आला असून अनुभवी फलंदाज तमिम इक्बाल या मालिकेसाठीही उपलब्ध होऊ शकलेला नाही. अष्टपैलू अरिफूल हक, अबू हिदर, ऑफस्पिनर नजमूल इस्लाम, मध्यमगती गोलंदाज रुबेल होसेन व अबू झायेद यांचाही या संघात समावेश नाही.

यीसिनकडून अपेक्षा

‘येत्या काही दिवसात बरेच टी-20 सामने होणार असल्याने आम्ही युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे. मेहदी व अफिफ यांच्याकडून आम्हाला भविष्यात बऱयाच अपेक्षा आहेत आणि ते दोघेही आंतरराष्ट्रीय दडपण कसे हाताळू शकतात, ते आम्हाला आजमावून पहायचे आहे. यीसिन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारत आला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो हीच मालिका कायम राखेल, अशी अपेक्षा आहे’, असे बांगलादेश निवड समितीच्या वतीने अबेदिन यांनी स्पष्ट केले.

‘सध्या आम्ही फक्त दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. त्यामुळे, ज्या खेळाडूंना आता संधी मिळालेली नाही, त्यांनाही यापुढे संधी असेलच’, याचाही त्यांनी उल्लेख केला. बांगलादेशमधील या तिरंगी मालिकेला दि. 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ढाका येथे शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर यजमान बांगलादेश-झिम्बाब्वे यांच्यात सलामीचा सामना होईल.

पहिल्या दोन टी-20 साठी बांगलादेश संघ : शकीब अल हसन (कर्णधार), लिटॉन कुमार दास, सौम्या सरकार, मुश्फिकूर रहीम, महमुदुल्लाह, अफिफ होसेन, मोसद्देक होसेन, शब्बीर रहमान, तैजूल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान, यीसिन अराफत.

Related posts: