|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी संघ घोषित

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी संघ घोषित 

हिमा दासची रिलेसाठी निवड, दोहामध्ये होणार स्पर्धा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व ज्युनियर चॅम्पियन हिमा दासची दोहामध्ये होणाऱया वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4ƒ400 मी. रिले संघात निवड करण्यात आली आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया या स्पर्धेसाठी भारताने 25 सदस्यीय पथकाची निवड जाहीर केली आहे.

एएफआयच्या निवड समितीच्या बैठकीनंतर खेळाडूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय संघटननेकडून (आयएएएफ) वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियन दुती चंदला परवानगी दिली तर तिचीही निवड होऊ शकते. तिने पात्रतेची मर्यादा गाठली नसली तरी स्पर्धकांच्या संख्येचा विचार करता तिला स्थान दिले जाऊ शकते. हिमा तिच्या आवडत्या 400 मी.साठी पात्र ठरू शकली नाही. पण 4ƒ400 मी. आणि 4ƒ400 मी. मिश्र रिलेसाठी तिचा समावेश करण्यात आला आहे. मिश्र रिलेमध्ये आपला संघ पदक जिंकू शकतो, अशी आशा एएफआयला वाटते.

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचीही यावेळी चर्चा करण्यात आली. पण त्याची निवड करण्यात आली नाही. हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुखापत पुनर्वसन प्रक्रियेतून तो जात आहे. तो शस्त्रक्रिया होण्याआधीच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला होता. पण दुखापतीतून तो अद्याप पूर्ण सावरलेला नसल्याने त्याची निवड होणार नाही, असे सूत्राने सांगितले. ‘ऑलिम्पिकसाठी तो आमचे आशास्थान असल्याने त्याने पुनरागमनाची घाई करू नये. निवड समितीने दुती चंद (100 मी) अर्चना सुसींत्रन (200 मी. महिला) व उंच उडीपटू तेजस्विन शंकर यांचीही निवड केली आहे. मात्र आयएएएफकडून त्यांना निमंत्रण मिळाले तरच ते सहभागी होऊ शकतील. महिलांच्या 400 मी. साठी अंजली देवीसाठी चाचणी ठेवण्याचा निर्णयही समितीने घेतला असून पतियाळा येथे 21 सप्टेंबर रोजी ही चाचणी घेतली जाईल,’ असेही या सूत्राने सांगितले. तेजस्विनला या स्पर्धेत भाग घ्यावयाचे असल्याने त्याने भारतात येऊन चाचणी देणे आवश्यक असल्याचेही सूत्राने स्पष्ट केले.

निवड समिती बैठकीस अध्यक्ष गुरबचन सिंग रंधावा, एएफआय अध्यक्ष अदिले सुमरिवाला, प्रमुख प्रशिक्षक बहादुर सिंग, बहादुर सिंग सग्गु, कृष्णा पुनिया, प्रवीण जॉली उदय प्रभू, परमजित सिंग उपस्थित होते तर माजी प्रमुख प्रशिक्षक जेएस सैनी व विद्यमान उपप्रमुख प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवडलेले भारतीय खेळाडू : पुरुष -जबिर एमपी (हर्डल्स), जिन्सन जॉन्सन (1500 मी), अविनाश साबळे (स्टीपलचेस), केटी इरफान व देवेंदर सिंग (चालणे), गोपी टी. (मॅरेथॉन), श्रीशंकर एम. (लांब उडी), तजिंदर पाल सिंग तूर (गोळाफेक), शिवपाल सिंग (भालाफेक), मुहम्मद अनास, निर्मल नोह टॉम, ऍलेक्स अँटनी, अमोज जेकब, केएस जीवन, धरुण अय्यास्वामी, हर्श कुमार (4ƒ400 मी. रिले व मिश्र रिले).

महिला : पीयू चित्रा (1500 मी.), अन्नू रानी (भालाफेक), हिमा दास, विस्मया व्हीके, पूवम्मा एमआर, जिस्ना मॅथ्यूज, रेवती व्ही., सुभा वेंकटेशन, विद्या आर. (4ƒ400 मी. रिले व मिश्र रिले).