|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » ‘रनमशिन’ स्टीव्ह स्मिथ अव्वलस्थानी कायम

‘रनमशिन’ स्टीव्ह स्मिथ अव्वलस्थानी कायम 

आयसीसी कसोटी मानांकन यादी : गोलंदाजी यादीत कमिन्स अव्वल, जसप्रित बुमराह तिसऱया स्थानी

दुबई / वृत्तसंस्था

मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी ताज्या मानांकन यादीत स्टीव्ह स्मिथने फलंदाजीत तर पॅट कमिन्सने गोलंदाजीत अव्वलस्थान कायम राखले. ऑस्ट्रेलियाने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय संपादन करत ऍशेस कायम राखल्यानंतर ताजी मानांकन यादी जाहीर केली गेली.

सामनावीर स्टीव्ह स्मिथने मँचेस्टरमधील त्या लढतीत पहिल्या डावात 211 तर दुसऱया डावात 82 धावांची दमदार खेळी साकारली आणि यामुळे त्याच्या खात्यात 937 रेटिंगची भर पडली. हे रेटिंग डिसेंबर 2017 मध्ये त्यानेच संपादन केलेल्या सर्वकालीन सर्वोत्तम रेटिंगपेक्षा फक्त दहाने कमी आहे.

सध्याच्या घडीला स्टीव्ह स्मिथ भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा 34 गुणांनी आघाडीवर असून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतरही त्याचेच अव्वलस्थान कायम राहणार, हे निश्चित आहे. इंग्लिश खेळाडू जोस बटलर 4 अंकांनी वर म्हणजे 37 व्या स्थानी तर रोरी बर्न्स कारकिर्दीतील सर्वोत्तम 61 व्या स्थानी पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे मानांकन 4 अंकांनी वधारले असून ताज्या मानांकन यादीत तो 60 व्या स्थानी आहे.

बांगलादेश-अफगाणिस्तान यांच्यात संपन्न झालेल्या चात्तोग्राम कसोटीतील कामगिरीचे प्रतिबिंबही नव्या यादीत उमटले आहे. अफगाणिस्तानने या लढतीत बांगलादेशविरुद्ध 224 धावांनी आश्चर्यकारक विजय संपादन केला होता.

अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाणने 92 व 50 असे अनुक्रमे दोन अर्धशतकी डाव साकारल्यानंतर तो 110 वरुन चक्क 63 व्या स्थानी पोहोचला तर पहिल्या डावात शतक झळकावणारा रहमत शाह 93 वरुन 65 व्या स्थानी झेपावला. सामन्यात 104 धावात 11 बळी घेणारा कर्णधार रशीद खान तेथे सामनावीर तर ठरलाच. शिवाय, येथे तो 69 वरुन 37 व्या स्थानी पोहोचला. अष्टपैलू मोहम्मद नबी 85 व्या स्थानासह कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला.

बांगलादेशतर्फे डावखुरे फिरकीपटू शकीब-उल-हसन व तैजूल इस्लाम अनुक्रमे 21 व 22 व्या स्थानी पोहोचले. ऑफस्पिनर नईम हसन 66 वरुन 21 व्या स्थानी पोहोचला.

कमिन्स 63 गुणांनी आघाडीवर

चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात 103 धावात 7 बळी घेणारा जलद गोलंदाज पॅट कमिन्स कारकिर्दीतील सर्वोत्तम 914 गुणांसह अव्वलस्थानी कायम राहिला. ही कामगिरी करणारा तो सर्वकालीन संयुक्त पाचवा व ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रासह संयुक्त सर्वोत्तम ठरला. मॅकग्राने 2001 साली कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग नोंदवले होते.

दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी जलद गोलंदाज कॅगिसो रबाडापेक्षा कमिन्स 63 रेटिंग गुणांनी आघाडीवर असून भारताचा जसप्रित बुमराह या यादीत तिसऱया स्थानी विराजमान आहे. जोश हॅझलवूड या वर्षात प्रथमच पहिल्या दहामध्ये पोहोचला असून 12 वरुन त्याने आठव्या स्थानी झेप घेतली आहे.

Related posts: