|Saturday, September 21, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्रिजेश यादवची विजयी सलामी

ब्रिजेश यादवची विजयी सलामी 

विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप : पोलंडच्या खेळाडूवर एकतर्फी मात

वृत्तसंस्था/ एकतेरिनबर्ग, रशिया

पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये भारताने चमकदार सुरुवात केली असून 81 किलो वजन गटात ब्रिजेश यादवने पोलंडच्या मुष्टियद्धय़ावर विजय मिळविला.

पहिल्या फेरीच्या लढतीत ब्रिजेशने मॅल्यूज गोइन्स्कीवर मात केली. या वर्षी झालेल्या इंडिया ओपन व थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत ब्रिजेशने रौप्यपदक मिळविले होते. त्याने गोइन्स्कीवर 5-0 अशी एकतर्फी मात केली आणि त्याच्या डोक्याला दुखापतही केली. दिवसभरातील भारताची ही एकमेव लढत होती. आकमक खेळण्यासाठी भारतीय पथकाने त्याला प्रवृत्त केल्यानंतर त्याने वेगाची उणीव ताकदवान ठोशांनी भरून काढली. या लढतीवेळी गोइन्स्कीला दोनदा उभे राहिल्याबद्दल पेनल्टीला सामोरे जावे लागले. यावेळी त्याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याचा चेहराही रक्तबंबाळ झाला होता. त्याने त्यावर उपचारही करून घेतले. या विजयानंतर ब्रिजेशने शेवटच्या 32 खेळाडूंत स्थान मिळविले असून त्याची लढत तुर्कीच्या बेराम माल्कनशी होणार आहे. माल्कनला पहिल्या फेरीत बाय मिळाले होते.

भारताच्या अमित पांघल (52 किलो गट), कविंदर सिंग बिश्त (57 किलो), आशिष कुमार (75 किलो) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाले आहे. या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 87 देशांच्या 450 हून अधिक मुष्टियोद्धय़ांनी भाग घेतला आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचा त्याला आधी दर्जा देण्यात आला होता. पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतील (एआयबीए) प्रशासकीय गोंधळामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्याचा हा दर्जा काढून घेतला. त्यामुळे या स्पर्धेत एकाही खेळाडूला ऑलिम्पिक कोटा मिळणार नाही. नेहमीच्या दहा गटाऐवजी सुधारित आठ विविध वजनगटात (52, 57, 63, 69, 74, 81, 91, 91 किलोवरील) ही स्पर्धा घेण्यात येत असून हेच वजनगट टोकियो ऑलिम्पिकसाठी ठेवण्यात आले आहेत.