|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला संघासाठी विश्लेषक नेमणार

भारतीय महिला संघासाठी विश्लेषक नेमणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी बीसीसीआयने परफॉर्मन्स ऍनालिस्ट (संघाच्या प्रदर्शनाचे विश्लेषक) पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असू नये, ही यासाठी पहिली अट आहे. दि. 20 सप्टेंबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येईल. बीसीसीआय वरिष्ठ संघाच्या कामगिरीचे विश्लेषण विविध माध्यमातून केले जाते. तोच कित्ता आता महिला संघासाठीही गिरवला जाणार आहे.

सदर पदावर नियुक्त केली जाणारी व्यक्ती गेम प्रिपेरेशन फॅसिलिटेटरची भूमिका बजावेल आणि तांत्रिक-धोरणात्मक निकषावर खेळाडूंचे विश्लेषण प्रशिक्षण पथकाला उपलब्ध करुन देईल, असे बीसीसीआयने याप्रसंगी म्हटले. प्रतिस्पर्धी संघांची मजबुतीची बाजू व कमकुवत बाजू याचाही या विश्लेषकाने अभ्यास करणे बीसीसीआयला अपेक्षित आहे. वरिष्ठ राज्य संघ किंवा समस्तर संघाशी किमान तीन वर्षे अनुभव असावा, अशी या पदासाठी अर्हता आहे.

भारतीय महिला संघ दि. 24 सप्टेंबर रोजी सूरत येथे खेळवल्या जाणाऱया पहिल्या टी-20 सामन्याच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत लढणार असून त्यापूर्वीच निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मंडळाचा मानस आहे. यापूर्वी आरती नळगे या भारतीय महिला संघाच्या पहिल्या परफॉर्मन्स ऍनॅलिस्ट ठरल्या. 2014 ते 2018 या कालावधीत त्या कार्यरत राहिल्या. धोरणे निश्चित करणे, आवश्यक टीप्स देणे, प्रतिस्पर्धी संघातील मुख्य खेळाडूंच्या शैलीचे व्हीडिओ उपलब्ध करुन देणे आदी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.

Related posts: