|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली, गुहागरची होणार अदलाबदल?

दापोली, गुहागरची होणार अदलाबदल? 

भास्कर जाधवांच्या सेना प्रवेशाने समीकरण बदलणार

प्रतिनिधी/ दापोली

 दशकभरापेक्षा अधिक काळ मनगटावर बांधलेले ‘घडय़ाळ’ सोडून पुन्हा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्यास सरसावलेले राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा ‘गुहागर इलाक्यावर’ चढाई करून भगवा फडकवण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. यामुळे गुहागरच्या भाजपाच्या किल्ल्यात गहजब माजला असून तेथील किल्लेदार डॉ. विनय नातू यांनी ‘सुभेदारी’ भाजपच्याच ताब्यात राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्यासाठी गुहागर व दापोली या दोन मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होणार असल्याच्या बातम्या नेटकऱयांनी नेटाने लावून धरल्याने उत्तर रत्नागिरीच्या राजकारणात मोठा कोलाहल माजला आहे.

   भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर झाडलेल्या पायधुळीची फुटलेली बातमी व त्याचा जाधव यांनी केलेला इन्कार या घटनांची डॉ. नातू यांनी मिष्कील शैल्लीत खिल्ली उडवली होती. भास्कर जाधव यांनी पुन्हा भगवा हाती घेतला तर तो गुहागरच्या उमेदवारीसह असेल हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. आता जाधव यांनी शिवसेना प्रवेशाची स्पष्ट घोषणा केल्याने गुहागरमधील गणिते बिघडली आहे. यापुर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासाठी भाजपला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते. यावेळी भास्कर जाधव यांच्यासाठी पुन्हा तसाच प्रकार घडण्याची शक्यता सोशल मिडीयामधून व्यक्त होत आहे. 

 भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगत वेळ मारून नेली असली तरी उमेदवारीच्या शब्दाशिवाय जाधव यांच्यासारखा बडा नेता पक्षांतर करणार नाही हे निश्चित. सध्या चिपळूण, राजापूर व रत्नागिरी येथे सेनेचे आमदार प्रतिनिधीत्व करत असून सेना-भाजप युतीमध्ये या तिन्ही जागा सेनेलाच मिळतील यात शंका नाही. त्यामुळे गुहागर व दापोली या दोनच ठिकाणी भाजपला संधी आहे. गुहागर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ असला तरी जाधव यांच्यामुळे त्यावर पुन्हा एकदा तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी जाधव यांनी अधिकृत भुमिका स्पष्ट केल्यापासूनच सोशल मिडीयावर तशा आशयाचे संदेश झळकू लागले आहेत.

  गुहागर मतदार संघ शिवसेनेला सोडून गतवेळी सेनेकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला दापोली मतदार संघ भाजपासाठी सोडला जाणार असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर फिरत आहेत. याबाबत दापोलीतील भाजपाच्या गोटात आनंदाची लहर पसरली असली तरी गुहागर भाजपमध्ये ‘चिंतेचे ढग’ दाटून आले आहेत. मात्र सध्या तरी याबाबत उघडपणे बोलायला व वाईटपणा घ्यायला कोणीही तयार नसल्याचे दिसून येत आहे.

 

एका दगडात अनेक पक्षी

दापोली व गुहागर मतदार संघांची जर अदलाबदल झाली तर एका दगडात अनेक पक्षी मरू शकतात. दापोली मतदारसंघ मित्रपक्ष भाजपला सोडल्यास सूर्यकांत दळवी व रामदास कदम यांच्यातील वादाला परस्पर मुठमाती देण्यात पक्षश्रेठींना यश येईल. यामुळे संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पुर्णविराम मिळेल. मात्र गुहागरमध्ये मोर्चेबांधणी करणाऱया डॉ. विनय नातू व दापोलीत सेनेकडून तयारी करणारे योगेश कदम यांची समजूत कशी घालायची हा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर निर्माण होणार आहे.

 

दापोलीत साठे की धाडवे?

भाजपाकडून दापोलीतून केदार साठे व कुणबी नेते शशिकांत धाडवे फिल्डींग लावून आहेत. गतवेळी समोरासमोर लढून या दोघांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे युतीमध्ये मतदारसंघ अदलाबदल झाल्यास या दोघांपैकी एकाला संधी मिळणार की गुहगरमधील उमेदवार देणार याबाबतच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

Related posts: