|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुद्रा योजनेद्वारे 52 लाखांचा अपहार

मुद्रा योजनेद्वारे 52 लाखांचा अपहार 

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पावस शाखेतील प्रकार, शाखाधिकाऱयासह 14 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुद्रा कर्ज योजनेचा लाभ उठविण्यासाठी बनावट कोटेशन व दस्तऐवज तयार करून  52 लाख 25 हजारांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या पावस शाखेत हा प्रकार घडला असून तत्कालीन शाखाधिकारी ब़ी आर साबळे (ऱा पावस, रत्नागिरी) यांच्यासह 14 जणांवर पुर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

     बँक ऑफ महाराष्ट्रच्या पावस येथील शाखेमध्ये गैरप्रकार चालू असल्याची माहीत व्यवस्थापनाला मिळाली होत़ी त्यानुसार 2015 ते 2019 पर्यंत या शाखेतून वितरीत झालेल्या मुद्रा योजनेतील कर्ज प्रकरणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान वितरीत करण्यात आलेली कर्ज व त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल़ी यामध्ये बनावट कोटेशन व दस्तऐवज तयार करून लाखोंचा घोटाळा झाल्याचे दिसून आले.

   या सर्व अपहारामध्ये बँकेचे शाखाधिकारीही सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने व्यवस्थापनाचे चांगलेच धाबे दणाणल़े या सर्व प्रकाराची गंभीर घेवून बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अतुल चिंतामण जोशी (53, ऱा सदाशिवपेठ पुणे) यांनी पुर्णगड पोलीस ठाण्यात तत्कालीन शाखाधिकारी साबळे व अन्य 14 जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आह़े

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाखाधिकारी साबळे यांनी 22 सप्टेंबर 2015 ते 18 जुलै 2019 दरम्यान 52 लाख 25 हजाराची मुद्रा कर्ज प्रकरणे मंजूर केली होत़ी यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या 14 जणांबरोबर साबळे यांनी संगनमत करून कर्ज योजनेसाठी बनावट दस्तऐवज तयार करून घेतले. त्यासाठी  बनावट कोटेशन्सही तयार करण्यात आली होत़ी या बनावट कागदपत्रांद्वारे साबळे यांनी ही सर्व कर्ज प्रकरणे मंजूर केली. त्यानंतर मंजुर झालेली कर्ज रक्कम  साबळे व अन्य 14 जणांनी संगनमत करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

  याप्रकरणी पुर्णगड पोलिसांनी तत्कालीन बँकशाखाधिकारी साबळे व अन्य 14 जणांविरूद्ध भादवि कलम 420, 409, 465, 467, 468, 471, 167 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरिक्षक गावीत करत आहेत़

मुद्रा योजनेत पुन्हा गैरप्रकार

 रत्नागिरी शहरालगतच्या उद्यमनगर येथील आनंद क्षेत्री खून प्रकरणात देखील मुद्रा कर्ज प्रकरणातील गैरप्रकार समोर आला होत़ा कर्नाटक येथून खूनाच्या आरोपाखाली फरार असलेल्या संशयिताला बँक ऑफ इंडीयाच्या कुवारबाव शाखेकडून मुद्रा योजनेत 9 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले होत़े याप्रकरणातही  तत्कालीन बँक अधिकाऱयाने संगनमत करून कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला होत़ा  दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी असे पत्र पोलिसांकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आले आह़े

   

Related posts: