|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंजे बसविण्याच्या वादातून दोघांवर कोयत्याने वार

पंजे बसविण्याच्या वादातून दोघांवर कोयत्याने वार 

प्रतिनिधी/ मिरज

मोहरममध्ये पंजे बसविण्याच्या वादातून मंगळवारी दुपारी खतीब गल्ली येथील दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघांवर धारधार कोयत्याने वार करण्यात आले. दर्गा आवारात पंजेभेटीवेळी हा प्रकार घडला. यामध्ये निहाल खतीब आणि शाहिद खतीब हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सध्या मोहरम म†िहना सुरू आहे. यामध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पंजांची स्थापना करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी वैरण बाजाराजवळ खतीब गल्लीत पंजे बसविण्याच्या वादातून खतीब आणि डबीर गटात वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा करण्यात आली होती. तेथील नागरिकांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला होता.

मात्र, पाच दिवस वाद धुमसत होता. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मोहरमची शेवटची पंजेभेट बाराईमाम दर्ग्यात झाली. त्यानंतर सर्व पंजे हे मिरासाहेब दर्ग्याकडे आले. त्यावेळी खतीब गल्लीतील पंजेही दर्ग्यात आले होते. त्यावेळी खतीब आणि डबीर गटात पुन्हा वाद झाला. यामध्ये डबीर गटाकडील तरुणांनी निहाल खतीब आणि शाहिद खतीब यांच्यावर धारधार कोयत्याने वार केले आहेत. यामध्ये निहाल हा गंभीर जखमी झाला. तर शाहिद याच्या बोटाला जखमा झाल्या आहेत. पंजेभेटीवेळीच हा प्रकार घडल्याने दर्ग्याजवळ खबळबळ उडाली. तेथे बंदोबस्तास असणाऱया पोलिसांनी तात्काळ जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. याप्रकरणी निहाल याचा भाऊ आवेस खतीब याने पोलिसांना माहिती दिली. त्याच्या सांगण्यानुसार जावेद डबीर, शाहिद डबीर, मलिक मुजावर, शमू ढाले, रसीद डबीर यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ऐन मोहरम सणाच्या शेवटच्या दिवशी शस्त्राने वार झाल्याने दर्गा परिसर आणि खतीब गल्लीत काहीकाळ तणाव होता. पोलीस उपाधीक्षक संदीपसिंग गील आणि निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण व्यवस्थितरित्या हताळले. रात्री या प्रकरणी फिर्याद घेण्याचे आणि संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.