|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा राजीनामा 

प्रतिनिधी/ सांगोला

 सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पत्राद्वारे प्रदेशाध्यक्षांकडे दिला. माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील हे जिह्यातील शरद पवारांचे अत्यंत विश्वसनीय व कट्टर समर्थक मानले जातात. मात्र साळुंखे-पाटील यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला सांगोला मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

  गेल्या काही दिवसापासून दीपकआबा साळुंखे-पाटील हे राष्ट्रवादीमध्ये  नाराज असल्याचे दिसून येत होते. नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान देखील त्यांची बेचेनी सर्व कार्यकर्त्यांना दिसून येत होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगोल्यातील मताधिक्यासाठी दीपक साळुंखे यांच्या डोक्यावरचे केस देखील काढून टाकु अशी टिंगल केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर साळुंखे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत होते.  त्याचे दुसरे कारण असेही आहे की, सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकापचे आ.गणपतराव देशमुख हे गेल्या पाच दशकांपासून प्रतिनिधीत्व करीत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा त्यांना कायमच पाठींबा राहीलेला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा लढवायची असल्यास त्यांना वेगळा पर्याय निवडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यासाठीसुध्दा हा राजीनामा असल्याचे बोलले जात आहे.

 विशेष म्हणजे साळुंखे-पाटीलांनी प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात आगामी विधानसभेसाठी सांगोला तालुक्यात लक्ष देण्यासाठी वेळ हवा आहे. असे राजीनाम्याचे कारण पुढे केले आहे. प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना पत्राद्वारे राजीनामा दिला  आहे. दरम्यान, साळुंखे गेल्या दोन महिन्यापासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. असे असले तरी साळुंखे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे असे तालुक्यात बोलले जात आहे. 

कार्यकर्त्यांच्यात आनंद

 मा.आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे दिपकआबा हे येणारी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची राजकीय लढाई लढण्यास साळुंखे पाटील सज्ज झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts: