|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुंबईच्या खेळाडूचा नरवणे येथे विहिरीत बुडून मृत्यू

मुंबईच्या खेळाडूचा नरवणे येथे विहिरीत बुडून मृत्यू 

वार्ताहर/ वरकुटे – मलवडी

माण तालुक्यातील नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या मुंबईच्या खेळाडूचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. अविनाश अनंत शिंदे (इंदिरानगर, साईनाथनगर रोड, घाटकोपर) वय 17 वर्षे असे मृत खेळाडूचे नाव आहे.

   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये कबड्डी स्पर्धा मोठय़ा प्रमाणात भरविल्या जातात. या कबड्डी स्पर्धेसाठी 65 किलो वजनी गटातील अनेक संघ आले होते. त्यापैकी मुंबई घाटकोपर येथील संघही आला होता. मंगळवारी सकाळी या संघातील चार ते पाच खेळाडू अंघोळीसाठी खटकाळी शिवारातील कॅनॉलवर गेले होते. कॅनॉलमध्ये अंघोळ केल्यानंतर चांगल्या पाण्यात अंघोळ करावी म्हणून शेजारीच असलेल्या लक्ष्मण काटकर यांच्या मालकीच्या विहिरीत हे खेळाडू अंघोळीसाठी गेले होते. त्यातील अविनाश शिंदे हा विहिरीत उतरला पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. उपस्थित खेळाडूंनाही पोहता येत नसल्याने त्याला वाचविता आले नाही. 

 सदर घटनेची नरवणे गावात वाऱयासारखी पसरताच घटनास्थळी गावकरी जमा झाले. पोलीस पाटील विजयसिंह काटकर यांनी या घटनेची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले. नुकतेच उरमोडीचे पाणी आल्याने विहिरी तुडुंब भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने चार ते पाच मोटर पंपाच्या उपसा सुरू केला. किरण काटकर या तरुणांने मोठय़ा शिताफीने अविनाशचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मुंबईहून आलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दीक्षित व हवालदार संजय केंगले करत आहेत. दरम्यान, मृत खेळाडू अविनाश शिंदे याच्या कुटुंबियांना नरवणे येथील गणेशोत्सव मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सुमारे एक लाखाची मदत देऊन शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.   

खेळाडूंना सर्व सुविधा पुरवल्या होत्या

 नरवणे गावात 55 वर्षांपासून गणेशोत्सव निमित्ताने विविध गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहे. दरवर्षी बाहेर गावावरून येणाऱया प्रत्येक खेळाडूंची राहण्याची, जेवणाची व आंघोळीसाठी पाण्याची सोय केली जाते. त्याप्रमाणे यावर्षी ही या सर्व खेळाडूंची सोय गावच्या शाळेत व गणेश मंदिरात केलेली होती. 

Related posts: