|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तलवारीचा धाक दाखवत महिला कडंक्टरला जीवे मारण्याची धमकी

तलवारीचा धाक दाखवत महिला कडंक्टरला जीवे मारण्याची धमकी 

प्रतिनिधी/ सातारा

वाई आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक सौ. शामल टिळेकर या सोमवारी सकाळी दरेवाडी बसच्या वाहक म्हणून गेल्या होत्या. कणूर शाळेजवळ बस नादुरुस्त झाल्याने थांबवली असता तेथील मारुती राजपुरे आणि त्यांच्या मुलगी प्रियांका हिने व मुलाने वाहक टिळेकर यांना शिवीगाळ करत चक्क घरातील तलवार काढून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वाई पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल करताना पोलिसांकडून मुलाचे नाव वगळण्यात आले असून याची चर्चा सुरू आहे.

  याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाई आगारातून दरेवाडी ही बस दिवसातून येजा करते. सकाळी 10 च्या सुमारास बसवर वाहक म्हणून सौ. शामल टिळेकर यांना डय़ुटी लागली. पुढे बस नेमकी कणूर येथील शाळेजवळ बंद पडली. बस बंद पडल्याची माहिती वाई आगारात दिली गेली. तोपर्यंत 11.30 च्या सुमारास तेथेच राहणारे मारुती सोपान राजपुरे आणि त्यांची मुलगी प्रियांका मारुती राजपुरे व त्यांच्या मुलाने वाहक शामल टिळेकर यांना शिव्या देत घरातील तलवार आणून त्यांना धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. भयभीत झालेल्या वाहक टिळेकर यांनी वाई पोलिसांत त्या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून एकाचे नाव वगळून कलमामध्ये फेरफार केल्याची चर्चा वाईमध्ये सुरू होती.

आरोपीस अटक करण्याची मागणी

महिला वाहक टिळेकर यांनी घडलेला प्रकार वाईच्या आगार प्रमुखांना कळवळा होता. आगारातील अधिकाऱयांनी अगोदर डय़ुटी पूर्ण करा असे फर्मावले. मात्र, या घटनेमुळे आगारातील सर्व कर्मचारी आक्रमक झाले. तेव्हा वाई पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मात्र, आता जोपर्यंत आरोपीस अटक केली जात नाही तोपर्यंत कणूरला जाणारी कोणती ही बस नेली जाणार नाही. कोणी अधिकारी सक्ती करत असेल तर त्या अधिकाऱयाचा निषेध करण्यात येईल, असा पवित्रा वाई आगारातील कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे आता वाई पोलीस काय कारवाई करतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: