|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोदकाच्या प्रसादाने उत्सवाला खुमारी

मोदकाच्या प्रसादाने उत्सवाला खुमारी 

प्रतिनिधी/ बेळगाव

तरुण भारत अस्मितातर्फे गणेशोत्सवात महिला भक्तांसाठी खास संधी म्हणून आयोजित करण्यात आलेल्या उकडीच्या मोदक स्पर्धेत प्रतिभा माने यांनी प्रथम क्रमांक मिळविला आणि बाप्पाबरोबरच श्रीभक्तांच्या आवडीच्या मोदकांची स्पर्धा मोदकाप्रमाणेच गोड झाली. बाप्पाच्या आवडीचा ‘प्रसाद’ ही उदात्त भावना ठेऊन स्पर्धेत 80 महिलांनी आपले पाककला कौशल्य सादर केले. महिलांच्या उदंड प्रतिसादातून आणि स्पर्धकांच्या पाककला कौशल्यातून स्पर्धा यशस्वी पार पडली. यानिमित्ताने मोदक तयार करण्याचे कौशल्य अनुभवण्याबरोबरच उकडी मोदकांची चव चाखण्याची संधीही प्रेक्षकांना मिळाली. यामुळे मोदकाच्या प्रसादाने गणेशोत्सवालाच जणू खुमारी आली.

तरुण भारत अस्मिता परिवारातर्फे अस्मिताच्या सभासद भगिनींसाठी मंगळवारी उकडीच्या मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. समादेवी गल्लीतील समादेवी संस्थानच्या सभागृहात सदर स्पर्धा पार पडली. प्रारंभी समादेवी संस्थानचे सेपेटरी मधुसुदन किनारी, वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती केसरकर, तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, स्पर्धेचे परीक्षक मयुर कामत, घनश्याम रेगे, सुमेश केळुसर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन व तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी तरुण भारत अस्मिताच्या महिला समन्वयक पूजा पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भारती केसरकर यांनी अस्मिताच्या उपक्रमांचा उद्द्sश महिलांसाठी उपयुक्त असल्याचे सांगत स्पर्धक महिलांना शुभेच्छा दिल्या. तर मधुसुदन किनारी यांनी आपले विचार मांडले. तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा तरुण भारतचा प्रयत्न असून त्यादृष्टीकोनातून उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शिवाय स्पर्धेसाठी समादेवी संस्थानने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

स्पर्धकांनी घरातून तयार करून आणलेले मोदक वीस मिनिटांच्या कालावधीत आकर्षकरित्या सादर केले. बाप्पाच्या प्रति÷ापनेपासून ते बाप्पाच्या पूजेपर्यंतची सजावट करून आपले सादरीकरणाचे कौशल्य सादर केले. पाना-फुलांची सजावट, सुकामेवा, तूप, दूध यांचा वापर मांडणीत करण्यात आला होता. शिवाय उकडीचा गणपती तसेच झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश देखील स्पर्धेच्या माध्यमातून दिला. यामुळे पाककला कौशल्याबरोबरच महिलांच्या कलाकृतीचे कौशल्यदेखील स्पर्धेतून अनुभवयाला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती जाधव यांनी केले.

चौकट

 विजेत्यांना कार्तिका सारीजर्फे बक्षिसांचे वितरण

उकडीच्या मोदक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा माने यांनी मिळविला तर मनीषा अनगोळकर यांनी द्वितीय व मंदा माळवी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. उत्तेजनार्थ पारितोषिक रेखा देशपांडे व ज्योती कारेकर यांना देण्यात आले. स्पर्धा पार पडताच मान्यवर व परीक्षकांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना कार्तिका सारीजर्फे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व पुष्प देऊन गौरविण्यात आले. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित यांच्या सौजन्याने सदर स्पर्धा पार पडली.

Related posts: