|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धास्ती कायम…

धास्ती कायम… 

प्रतिनिधी/   चिकोडी

  गेल्या चार-पाच दिवसापासून जीव मुठीत धरलेल्या चिकोडी उपविभागातील नदी काठावरील जनतेने मंगळवारी पावसाच्या उघडिपीमुळे थोडा का असेना सुटकेचा निःश्वास सोडला आहे. असे असले तरी कृष्णा व तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत मंगळवारीही वाढच दिसून आली. या वाढत्या पातळीमुळे काही नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर सुरूच ठेवल्याचे चित्र नदीकाठ परिसरात दिसून आले. दरम्यान उपविभागातील बंधारे पाण्याखालीच असल्याने वाहतूक ठप्प आहे.

   चिकोडी उपविभागातील विविध नद्यांच्या पाणीपातळीत मंगळवारी 1 ते 2 फुटांनी वाढ झाल्याने पूरग्रस्तांची चिंता पुन्हा वाढली आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, वारणा, काळम्मावाडी, राधानगरी तर पाटगाव या धरण प्रदेशात पावसाच्या प्रमाणात घट झाली असली तरी एक दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे चिकोडी विभागातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढच दिसून आली.

  दूधगंगा नदी, राजापूर जलाशयाचे पाणी मोठय़ा प्रमाणात कृष्णा नदीत कल्लोळ येथे येत असल्याने तालुक्यातील कल्लोळ, येडूर, चंदूर, मांजरी, इंगळी, मांजरीवाडीसह नदीकाठावरील शेतवाडय़ात असलेले लोक आपल्या जनावरांसह पुन्हा सुरक्षित ठिकाणी आसरा घेत असल्याचे चित्र मंगळवारी उपविभागात पहावयास मिळाले. हिप्परगी जलाशयात येणाऱया सर्वच्या सर्व पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात परिस्थिती अशीच राहिल्यास पात्र सोडलेल्या नद्या पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

  जनावरांच्या चाऱयासाठी धडपड

  पुरग्रस्तांना आता जनावरांच्या चाऱयासाठी धडपड करावी लागत आहे. प्रशासनाद्वारे केवळ आकडेवारीच देण्यात येत आहे. चाऱयाची अडचण भासू लागली आहे. यासाठी दानशुरांनी या मुक्या प्राण्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चाऱयाचीही व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.  

निवारा केंद्रातील बालक आजाराने मृत्युमुखी

अतिवृष्टी आणि पुरामुळे रामदुर्ग तालुक्मयातील सुरेबान गावातील नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. या केंद्रातील बालक तापामुळे मृत्युमुखी पडले आहे. मंगळवारी ही घटना घडली असून, जिल्हाधिकारी डॉ. एच. बी. बोम्मनहळ्ळी यांनी या प्रकरणाची जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकाऱयांकडून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणाची नोंद स्थानिक पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पूरग्रस्तांची योग्य ती काळजी न घेतल्याचा ठपका ठेऊन कामात दुर्लक्षपणा दाखविलेल्या अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मंगळवारी बेळगाव जिल्हा दौऱयावर आले असताना ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांना पाच लाखाची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. 

Related posts: