|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस-न्यायालयाच्या कचाटय़ात वाहनचालक

पोलीस-न्यायालयाच्या कचाटय़ात वाहनचालक 

प्रतिनिधी/ बेळगाव

कागदपत्रे नसलेल्या वाहन चालकांकडून दंड आकारणी सुरू आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी करत मोठा दंड पोलीस वसूल करत आहेत. वाहन चालकांना याबाबत नोटिसा देण्यात येत आहेत आणि न्यायालयामध्ये दंड भरण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, नवीन कायद्याच्या रकमेबाबत अजून न्यायालयामध्येच आदेश आला नाही. त्यामुळे न्यायालयांमध्ये दंड भरून घेण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे वाहन चालकांची मोठी कोंडी निर्माण होऊ लागली आहे.

शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस उभे राहून वाहनांची अडवणूक करून विविध कारणांनी त्यांना नोटिसा देत आहेत. न्यायालयात जाऊन दंड भरावा, अशी सूचना करण्यात येत आहे. त्यानंतर ती नोटीस घेऊन न्यायालयात वाहनचालक गेला असता अजून नवीन दंडाच्या आकारणीबाबत आमच्याकडे आदेश आला नाही. त्यामुळे ही रक्कम भरून घेणे अशक्मय असल्याचे सांगितले जात आहे. बऱयाचवेळा वाहनेही जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालक अडचणीत येत आहेत.

न्यायालयामध्ये दंड भरल्याशिवाय वाहनाची सुटका होत नाही. त्यामुळे वाहनचालक न्यायालयामध्ये जाऊन दंड भरण्यासाठी आटापिटा करत आहेत. काही जणांची वाहने पोलीस स्थानकामध्ये 8 ते 15 दिवस पडून आहेत. एक तर न्यायालयामध्ये दंड स्वीकारला जात नाही, त्याचबरोबर पोलीस वाहन सोडत नाहीत. या कचाटय़ामध्ये वाहनचालक अडकले असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवीन कायद्याच्या बडग्यामुळे वाहनचालक अडचणीत आले आहेत. एक तर दंडाची रक्कम पाहता ती भरणे अशक्मयच असते. तरीदेखील काही तरी तजवीज करून वाहनांसाठी नागरिक धडपडत आहेत. तेव्हा आता पोलिसांनीच याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

दंडाच्या रकमेमुळे वाहनचालकांतून नाराजी

नवीन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर दंडाची रक्कमही अधिक आहे. ही रक्कम भरणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. यामुळे वाहनचालकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वाहन चालविण्यापेक्षा बस किंवा इतर भाडोत्री वाहनांचा आधार घेणेच सोयीचे ठरू लागले आहे. याबाबत अनेक वाहनचालकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही वाहनचालक तर या दंडाच्या रकमेविरोधात जनयाचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Related posts: