|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » संत संगतीमुळे मनातील विकल्प दूर होऊन ज्ञानाची प्राप्ती होते

संत संगतीमुळे मनातील विकल्प दूर होऊन ज्ञानाची प्राप्ती होते 

पुणे / प्रतिनिधी : 

आयुष्यात संगत खूप महत्वाची आहे. चांगल्या संगतीने मनुष्य मोठा होतो, तर वाईट संगतीमुळे मनुष्य रसातळाला जाऊ शकतो. त्यामुळे आयुष्यात संतसंगती खूप महत्वाची आहे. साधू-संतांची संगत लाभली की मनुष्याच्या मनातील विकल्प दूर होतो. संतांची संगत लाभल्यावर ज्ञानाची प्राप्ती होते. साधू-संतांच्या दर्शनाने मनुष्याच्या जीवनात अमूलाग्र बदल घडतो, अशी संतांची महती प्रेमा कुलकर्णी यांनी आपल्या कीर्तनातून उलगडली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबागेतील राममंदिराच्या सभामंडपात भाद्रपद शुक्ल (परिवर्तिनी) एकादशीनिमित्त कीर्तनकार प्रेमा कुलकर्णी यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, रामचंद्र तुळशीबागवाले, रघुराज तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आदी उपस्थित होते.

प्रेमा कुलकर्णी म्हणाल्या, संतसंगतीमुळे बुध्दीला चालना मिळते, वाणी सत्यवचनी होते, मनुष्यातील दोष झाकते आणि सद्गुण जगाला दाखवते. साधुसंतांची संगत इथपर्यंत जाते की प्रत्यक्ष संतांना देखील शिष्यामुळे भगवंताचे दर्शन घडते. शिष्य आणि गुरु दोघांनाही भगवंताचे दर्शन घडते.