|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » क्मया बेटियाँ बचेंगी?

क्मया बेटियाँ बचेंगी? 

भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. या एसआयटीचे नेतृत्व आयजी पदावरील अधिकारी करेल. या मुलीच्या भावाचा प्रवेश दुसऱया महाविद्यालयात करावा, कारण चिन्मयानंद यांच्या ट्रस्टच्यावतीने चालवल्या जाणाऱया महाविद्यालयात शिक्षण घेण्यास त्याला भीती वाटत आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनादेखील संरक्षण द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  तिच्या वडिलांनी चिन्मयानंद यांच्यावर मुलीचे अपहरण करून शोषण केल्याचा आरोप करून, तक्रार दाखल केली होती. चिन्मयानंद यांनी मात्र हा आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

भाजपच्या अनेक व्यक्तींवर याप्रकारचे आरोप होताना दिसतात. लाल किल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार मुलींना संरक्षण देऊन त्यांना मुलांच्या बरोबरीनेच समान संधी देण्याचा उच्चार करत असतात. केंद्र सरकारने महिलांसाठी ‘महिला ई-हाट’ नावाची योजना सुरू करून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवीन पाऊल टाकले आहे. ‘बेटी बटाओ बेटी पढाओ’ या घोषणेचा जोरदार प्रचार सुरू आहे. ‘निर्भया निधी’च्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी शोषणाचे बळी ठरलेल्या महिलांना अहोरात्र हेल्पलाईन पुरवणारी ‘सखी’ योजना सुरू करण्यात आली. काम करणाऱया स्त्रियांसाठी वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. अडचणीत असलेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय महिला व बालविकास खात्याने खूप पूर्वीपासूनच स्वाधार गृह ही योजना राबवली आहे. स्त्रियांना प्रशिक्षण व रोजगार मिळवण्यासाठी त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने, उद्योग उभारण्याकरिता त्यांना मदत व्हावी म्हणून, ‘स्टेप’ ही योजना आखण्यात आली आहे. नारीशक्ती पुरस्कारही सरकारतर्फे देण्यात येतात. परंतु भाजपच्याच अनेक कार्यकर्ते व नेत्यांवर महिलांसंबंधात वारंवार आरोप होत आहेत, ही गंभीर गोष्ट  आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच मुंबईत एका 17 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याबद्दलचा प्राथमिक गुन्हा भाजपच्या कल्याण शाखेचे उपाध्यक्ष गोपिनाथ माळी यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये दोन वर्षांपूर्वी भाजपचे आमदार कुलदीप सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. अलीकडेच तिला कारचा अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यात ती वाचली, पण तिच्या नात्यातील दोघींचा त्यात मृत्यू ओढवला. हा अपघात घडवून आणणाऱया आरोपींमध्ये उन्नावचे भाजपचे ब्लॉक अध्यक्ष अरुण सिंग यांचाही समावेश आहे. अरुण सिंग हे उत्तर प्रदेशचे मंत्री रणवेंद्रप्रतापसिंग ऊर्फ धुन्नीभैया यांचे जावई होत. 2019च्या प्रचारसभांमध्ये अरुण सिंग हे भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा आणि उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांच्यासमवेत दिसत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. साक्षीमहाराज हे सेंगर यांना तुरुंगात भेटायलाही गेले होते. गेल्या वषी जम्मूतील कथुआमध्ये एका बालिकेवर अत्याचार होऊन, तिचा खून करण्यात आला होता. त्यातील आरोपींच्या समर्थनार्थ भाजपचे मंत्री चौधरी लालसिंग आणि चंद्रप्रकाश गंगा यांनी सहभाग घेतला होता. या मुलीच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असे ध्रुवीकरण झाले. त्यावेळी मेहबूबा मुफ्ती सरकार होते आणि त्या सरकारात भाजपही सहभागी होता. या प्रकरणाची पोलीस चौकशी झाल्यावर, त्यातून निघालेले निष्कर्ष राज्य भाजपने फेटाळून लावले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली. 370 व्या कलमाच्या निमित्ताने भाजप ‘आम्ही महिलांनाही समान हक्क देऊ इच्छित आहोत’, असे सांगत आहे. परंतु कथुआत काय घडले, हे लोक विसरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चिन्मयानंद यांनी कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, असा आरोप संबंधित पीडित मुलीने केला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वजण चिन्मयानंदांचे समर्थन करत आहेत. म्हणूनच मला संरक्षण द्या, अशी मागणी या मुलीने पंतप्रधान तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. ही मुलगी शहाजहानपूर येथील असून, ती तिथल्या कायद्याची विद्यार्थिनी आहे. चिन्मयानंद यांच्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर काही दिवस ती बेपत्ता झाली. नंतर तिचा पत्ता लागला आणि तिला सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात यावे, असा आदेशही निघाला. ‘मोदीजी, हा माणूस संन्यासी आहे. पोलीस, जिल्हा दंडाधिकारी आणि बाकीचे सर्वजण माझ्या बाजूने आहेत. तुला काय करायचे ते कर, अशी धमकी मला दिली जात आहे,’ असे तिने या व्हीडिओत म्हटले आहे. पीडिता बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी तक्रार नोंदवली. अपहरण व धमकावणे हे आरोप ठेवण्यात आल्यानंतरही काही दिवस पोलिसांनी चिन्मयानंदचे जाबजबाबही घेतलेच नाहीत. वाजपेयी सरकारात हा माणूस मंत्री होता. बेपत्ता झाल्यानंतर एक आठवडय़ाने पीडितेचा राजस्थानमध्ये शोध लागला. त्यानंतर ‘ही मुलगी अगदी आनंदात आणि व्यवस्थित आहे’, असे म्हणून, उत्तर प्रदेशचे डीजी ओ. पी. सिंग यांनी ‘ती स्वेच्छेने ठिकठिकाणी गेली’, असे मत नोंदवले. चिन्मयानंद हा तीनवेळा खासदार राहिलेला आहे. शहाजहानपूरमधील एस एस लॉ कॉलेजचा तो संचालक असून, त्यातच ही पीडिता शिकत आहे. सेंगर यांच्याप्रमाणेच माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्याकडून पाच कोटी रु. उकळण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्याने केला. म्हणजे, केवळ आपणच निर्दोष आहोत असे नसून, सेंगरही निर्दोष असल्याचा त्याचा दावा आहे. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव या पीडितेने रचला असल्याचा त्याचा आरोप आहे. खरं तर, मुळातच मलिन असेलली योगींची प्रतिमा आणखी मलिन ती काय होणार…उत्तर प्रदेशातील काही जबाबदार वकिलांनी ‘हे दुसरे उन्नाव प्रकरण होऊ शकते’, अशी काळजी व्यक्त केली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली.  सेंगरवर उन्नाव पीडितेच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे व त्यापायी तो तुरुंगात आहे. त्याच्या मुसक्मया आवळल्यावर कित्येक महिने लोटल्यानंतरच भाजपने त्याला पक्षातून काढून टाकले. चिन्मयानंदचा शहाजहानपूरमध्ये मोठा आश्रम आहे. त्याची पाच महाविद्यालये आहेत आणि हजारो कोटींची मालमत्ता त्याच्याकडे आहे. आश्रमाबाहेर योगी आदित्यनाथ व अन्य बडय़ा भाजप नेत्यांसोबतची आपली पोस्टर्स त्याने लावली आहेत. 2011 सालीदेखील आश्रमात राहणाऱया एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. ताज्या प्रकरणात तर, ही मुलगी खूपच घाबरून गेली होती. ‘माझा फोन बरेच दिवस ऑफ असेल, तर मी संकटात आहे असं खुशाल समजा. फोन माझ्या हातात नसेल, तेव्हाच तो ऑफ आहे, असं समजा’, हे त्या पीडितेचे शब्द होते. तिला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. बेटी बचाओ, अशी हाक देणाऱया पक्षाच्या नेत्यांपासूनच मुलींना वाचवण्याची पाळी यावी, हे दुर्दैव आहे. यापुढच्या काळात तरी मोदीजी देशातील मुलींना सुरक्षित जीवन बहाल करतील, अशी आशा करुया.

नंदिनी आत्मसिद्ध

Related posts: