|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘वंचित’चा तलाक!

‘वंचित’चा तलाक! 

अखेर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांमध्ये घटस्फोट झाला आहे.एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तीयाज जलिल यांनी पाच दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे जाहीर केले होते. ओवेसींनी त्या तलाकला मान्यता दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या आसपास असलेले रा. स्व. संघाच्या विचाराचे लोक वंचित आणि एमआयएममध्ये विघ्न आणत असून आपण आधी 94 आणि नंतर 74 जागा मागितल्या होत्या. पक्षाच्या बैठकीत आमच्या मागणीवर चर्चा होण्याऐवजी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली गेली. ओवेसी यांच्याशी पुण्यात तीन तास बैठक घेतली मात्र त्यानंतर केवळ आठ जागा देण्याचा संदश देण्यात आला. आम्ही 74 जागांवरही तडजोड करायला तयार होतो, मात्र आम्हाला किती जागा देणार हेच निश्चित होत नसल्यामुळे आम्ही आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केल्याचे खा. जलील यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खुद्द आंबेडकर यांनी जोपर्यंत ओवेसी काही जाहीर करत नाहीत तोपर्यंत मैत्री कायम आहे अशी भूमिका घेतली होती. मात्र ही शेवटची आशा ओवेसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार बैठक घेऊन संपुष्टात आणली. काँग्रेसशी युती करायला अडथळा आहे म्हणून आंबेडकर अशी भूमिका घेत आहेत काय, अशी शंका आधी घेतली जात होती. मात्र याच दरम्यान आंबेडकरांनी काँग्रेसशी युती शक्य नाही, आम्ही स्वबळावर सर्व 288 जागा लढवू अशी घोषणा केली आहे. ही घोषणा झाली तेव्हा ओवेसी यांची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. मात्र आताही वंचित आघाडी स्वबळावर लढणार असेल तर त्याचा लाभ कोणाला होणार?  शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे पुढचा विरोधी पक्षनेता काँग्रेस राष्ट्रवादीऐवजी वंचित बहुजन आघाडीचा खरोखरच होईल का याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी थोडे भूतकाळातही डोकवावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत डझनाहून अधिक जागांवर वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर पराभूत झाले. प्रकाश आंबेडकरही पडले. फक्त जलील निवडून आले. जलीलना आमची मते मिळाली पण मुस्लिमांची मते आम्हाला मिळाली नाहीत, मशिदीत जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने ती मिळवली असे आंबेडकर म्हणत राहिले. जलील यांनी आपल्या पत्रकात जागांच्या घोषणेऐवजी लोकसभेच्या निकालावर वंचितच्या नेत्यांनी चर्चा केली असे जे म्हटले, ते हेच होते. कदाचित त्याचा राग म्हणून आपल्याला आंबेडकर कमी जागा देत आहेत आणि जिथून आमदार निवडून आला तो औरंगाबादेतील मतदार संघही सोडायला तयार नाहीत हे एमआयएमला सुचवायचे असावे. ओवेसी यांच्या घोषणेनंतर जलील यांनी बुधवारी तीन उमेदवारांची घोषणा केली. त्यातील एक पुणे जिल्हय़ातील वडगाव शेरी मतदार संघातील नगरसेविकेचा पती आहे जो ख्रिश्चन असून एमआयएमने आपले स्वतःचे सोशल इंजिनिअरिंग त्यानिमित्ताने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात दोन पक्षांमध्ये अनेकदा ताणले जाते आणि पुन्हा बोलणी होतील का, यावर ओवेसी यांनी मौन बाळगले आहे. तलाक झाला तरी जुळवून घेतले जाईल का, हे भविष्यातच समजणार आहे. वंचितच्या पत्रकातही भाजप सरकार ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा कट रचत असून ओबीसींनी याविरोधात वंचित सोबत राहिले पाहिजे असे पत्रक यापूर्वी प्रसिद्धीस दिले होते. या ओबीसींमध्ये मुस्लीम ओबीसी आंबेडकरांना अपेक्षित असावेत. जे कदाचित भविष्यात वंचितचे मतदार राहू शकतील अशी मांडणी आंबेडकरांनी केलेली दिसते. यापूर्वी काँग्रेसने त्यांना भाजपची बी टीम म्हटले होते. विधानसभेच्या जागा वाटपासाठी निमंत्रित करताच त्यांनी काँग्रेसकडून त्याचा खुलासा मागितला आणि 144 जागा मागितल्या. ‘राष्ट्रवादी सोडून बोला’ हा त्यांचा ठेकाही कायमच होता. त्यापूर्वी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनीही आंबेडकरांच्यावर टीका करून त्यांची साथ सोडली होती. तर जुलै महिन्यात ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनीही रा. स्व. संघ विचारसरणीचे लोक आंबेडकरांभोवती जमले आहेत असा आरोप करत पक्ष सोडून स्वतःची आघाडी स्थापन केली होती. वंचितने कोळसेंना जनता दलाचे आणि मानेंना राष्ट्रवादीवाले ठरवले होते. आता एमआयएमच्या तलाकमुळे आंबेडकरांची खरी लढाई सुरू होणार आहे. माझ्या आघाडीमुळे कुणाला फायदा होतो हे आता मी बघणार नाही पण, वंचितांची म्हणून एक ताकद उभी करणार असे सांगून उभे राहिलेल्या आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न अकोल्यात काही काळ यशस्वी झाला, नंतर अपयशी झाला. त्यांचा भारीप बहुजन महासंघ प्रशंसेस पात्र ठरला मात्र प्रभाव पाडू शकला नव्हता. त्याहून कितीतरी अधिक उपद्रवमूल्य वंचितने दाखवून दिले होते. आपल्या या उपद्रवमूल्याला आंबेडकर यांनी शक्ती म्हटले होते आणि त्यात मुस्लिमांची मते सामील नाहीत. ती मते न मिळाल्याने आपला पराभव झाला हेही त्यांनी स्पष्ट केले हेते. संघावर टीका आणि एमआयएमशी जवळीक कशी, यावर आंबेडकरांचे उत्तर एमआयएम एक नोंदणीकृत, घटना मानणारा पक्ष आहे असे होते. आजपर्यंत प्रत्येक प्रश्नाला आंबेडकर यांनी उत्तर देऊ केले आहे. पण, त्यांच्या पॅटर्नने महाराष्ट्रात भाजपचेच भले झाले आहे हेही वास्तव आहे. ज्या संघाला घटनेच्या चौकटीत बसवायची ते मागणी करत आहेत त्याच संघ विचारातून घडलेल्या भाजपच्या फायद्याची लढाई आहे असा आरोप होतो आहे. मात्र आंबेडकर हे मानायला तयार नाहीत. आपणास तात्कालिक राजकारण करायचे नाही असे ते सांगत आले असले तरीही त्यांच्या दीर्घकालीन नियोजनाला एमआयएमने तलाक देऊन तिसरा धक्का दिलेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे इतक्या फाटाफुटीनंतर पुढे काय होणार हा जसा प्रश्न आणि यशाबद्दल संभ्रम आहे तसाच वंचितचे यश आणि आंबेडकरांची भूमिका याबद्दल मित्रपक्षांसह मतदारांतही प्रचंड संभ्रम आहे. विरोधकांच्या मते आंबेडकरांना स्वतःच्या शक्तीचा संभ्रम आहे. मतदाराला सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या विरोधात शक्ती उरेल की नाही, याबद्दलही संभ्रम आहे. बहुदा विधानसभा निवडणुकीनंतरच हे सर्व संभ्रम दूर होतील.

Related posts: