|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जि.प.सीईओंवर अविश्वास आणणार

जि.प.सीईओंवर अविश्वास आणणार 

म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांची माहिती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हा परिषद शिक्षक समुपदेशन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या असमन्वयाच्या कारभाराविरोधात जिल्हा परिषद अध्यक्षासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एल्गार पुकारला आहे. लोकप्रतिनिधींना न जुमानल्याप्रकरणी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी नोटीस देण्यात येणार असल्याचे शिवसेना उपनेते , म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने राबवलेल्या शिक्षक समुपदेशन प्रकरणावरून नाराज झालेल्या जिल्हा परिषद सर्व पदाधिकाऱयांनी शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यासंदर्भात बुधवारी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेनंतर गोयल यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील जि.प.च्यासर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना जि.प.पदाधिकारी, सदस्यांनी मनमानी कारभाराविरोधात अविश्वास आणू अशी सूचनाही केली होती. मात्र त्यानंतरही त्यांच्या वर्तवणूकीत फारसा बदल झाला नसल्याचे यावेळी ज्येष्ठ सदस्य उदय बने यांनी सांगितले. 

जि. प. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय सभेत बोलता येणार नाही, हे स्पष्ट करूनही गोयल यांनी आपला हेका सोडलेला नाही. आता शिक्षक समुपदेशन प्रक्रियेतही पदाधिकाऱयांबरोबर समन्वय ठेवला नसल्याचा आक्षेप बने यांनी घेतला आहे. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडले तर जिल्हय़ात त्या शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार. त्याचा परिणाम जिल्हय़ातील शैक्षणिक कामकाजावर होणार असल्यानेच या प्रक्रियेला आमचा विरोध होता. मात्र गोयल यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत झालेल्या चर्चेनंतर जर मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल या जि.प. पदाधिकाऱयांनी सांगूनही त्यांना जुमानत नसतील. तर पदाधिकाऱयांनी घेतलेली बहिष्कारीची भुमिका योग्यच असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.  जि.प. अध्यक्षांमार्फत मुख्यकार्यकारी अधिकाऱयांविरोधात अविश्वास आणण्यासाठी नोटीस देण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले आहे. कलम 1961 चे कलम 94 (3) अन्वये त्यासाठी सर्वसाधारण सभेत बहुमताच्या ठराव आवश्यक असतो. त्याला सभेद्वारे मंजूरी घेतली जाईल. या ठरावाला सत्ताधारी शिवसेनेसह आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही साथ दर्शविली असल्याचे सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडेही याप्रकरणाचा वृत्तांत कथन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 या पत्रकार परिषदेला सेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, जि.प.अध्यक्षा  स्वरूपा साळवी, सभापती सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, विनोद झगडे, साधना साळवी, भाजपाचे पदाधिकारी दत्ता देसाई आदी उपस्थित होते. 

ग्रामसेवकांविरोधातदबावाचे राजकारण – स्वरूपा साळवी

जिल्हय़ात राबवण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीच्या कार्यक्रमासाठी ग्रामसेवकांना जबरदस्तीने काम करायला लावणे,  ते न करणाऱयांना नोटीस बजावणे, ग्रा.पं.तपासणी करणे असा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून सुरू आहे. याबाबत आपण त्यांना पत्रही पाठवले होते. मात्र त्यांनी ग्रामसेवकांवर दबाव टाकण्याचे काम केले. वेळोवेळी दिलेलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष,  जि.प.सदस्यांना योग्य ती वागणूक न देणे अशी मनमानी सुरू आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्र काम करणे आवश्यक आहे, मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याचे जि. प. अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी सांगितले. 

आदर्श पुरस्कारावर शिक्षकांचा बहिष्कार

13 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारचे वितरण केले जाणार आहे. मात्र बुधवारी शिक्षक समुपदेशन प्रक्रियेवेळी शिक्षक संघटना पदाधिकाऱयांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी अपमान केल्याने या पुरस्कार सोहळय़ावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांच्यावतीने घेण्यात आला आहे.

Related posts: