|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कापडगावच्या सुपुत्राने रेखाटलेले डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र मंत्रालयात

कापडगावच्या सुपुत्राने रेखाटलेले डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र मंत्रालयात 

रमेश कांबळेंच्या कलाकृतीचा सन्मान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले नुकतेच अनावरण 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रशासनाचा केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीत रत्नागिरी तालुक्यातील कापडगावचे सुपुत्र रमेश कांबळे यांनी साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

  मंत्रालयाच्या इमारतीत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे तैलचित्र असावे, यासाठी राज्याच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भोतकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भातीलप्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. हे तैलचित्र कसे असावे, कोणाला त्याचे काम द्यावे यासंदर्भात भोतकर यांनी बार्टीच्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट) अधिकाऱयांसोबत चर्चा केली. तैलचित्र बसविण्यासाठी इमारतीतील जागेचे मोजमाप आणि संबंधित अधिकारी, कलाकारांशी चर्चा करण्यात आली.

  तैलचित्राच्या निर्मितीचा अफाट खर्च सांगितल्याने मुंबईतील प्र्रसिद्ध चित्रकार तथा कापडगावचे सुपुत्र रमेश कांबळे यांचे नाव पुढे आले. तैलचित्र बनविण्यासाठी कांबळे यांनी होकार दर्शविला व काम पूर्णत्वासही नेले. 15 ऑगस्ट रोजी या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्याचा मानस होता, मात्र वेळेअभावी ते शक्य झाले नाही. 7 ऑगस्टला कांबळे यांना वर्क ऑर्डर मिळाली. दिवस-रात्र काम करून कांबळे यांनी 14 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाची प्रास्ताविका मंत्रालयाकडे सुपूर्द केली. या तैलचित्राचे 9 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी रमेश कांबळे यांचे ज्येष्ठ बंधू दामोदर कांबळे, बौध्दजन हितवर्धक संघ कापडगाव (मुंबई) चे प्रवीण कांबळे, सचिव समीर कांबळे आदी उपस्थित होते. चित्रकार रमेश कांबळे हे बॉम्बे आर्ट सोसायटीचे आजीव सदस्य, आर्ट ऑफ इंडियाचे सदस्य, बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव (मुंबई)चे सदस्य आहेत. कापडगांव बुद्ध विहारासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी देखील रमेश कांबळे यांचे मोलाचे सहकार्य आहे.

 

Related posts: