|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विधानसभेच्या तीनही जागा बसपा स्वबळावर लढणार

विधानसभेच्या तीनही जागा बसपा स्वबळावर लढणार 

वार्ताहर / मालवण:

ऑक्टोबर 2019 मध्ये होणाऱया महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकासंदर्भात बहुजन समाज पार्टीची राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत राज्यातील 288 जागा स्वबळावर लढविण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विधानसभेच्या तीनही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती बसपाचे नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीला केंद्रीय महासचिव राज्याचे प्रमुख प्रभारी रामअचल राजभर, राज्य प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेश अध्यक्ष सुरेख साखरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. बहुजन समाज पार्टी देशातील तीन नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाचे लोकसभेत 10 खासदार तर राज्यसभेत 5 खासदार आहेत. देशातील सर्व राज्यामध्ये पक्ष कार्यरत आहे. तरीही राज्यातील आंबेडकरवादी, समविचारी पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील 288 जागा स्वबळावर लढविण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार बसपा सिंधुदुर्ग जिल्हय़ाची बैठक नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीला जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर, रवींद्र कसालकर, अध्यक्ष दीपक जाधव, कोषाध्यक्ष एस. एस. विणकर, जिल्हा सचिव विजय साळकर, विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विधानसभेच्या तीनही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आले. मुंबई, कोकण, विभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार आहेत.