|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळला नोव्हेंबरमध्ये राज्यस्तर कृषी, पशुपक्षी प्रदर्शन

कुडाळला नोव्हेंबरमध्ये राज्यस्तर कृषी, पशुपक्षी प्रदर्शन 

जि.प.उपाध्यक्ष रणजीत देसाई यांची माहिती

जि.प.पशुसंवर्धन समिती सभा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जि. प. मार्फत आयोजित करण्यात येणारे राज्यस्तर कृषी व पशुपक्षी प्रदर्शन नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसऱया आठवडय़ात कुडाळ येथे भरविण्यात येणार असल्याचे व निश्चित करण्यात आल्याचे जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी जि. प. च्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीच्या सभेत जाहीर केले व कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीलाही लागा, अशा सूचना सर्व खाते प्रमुखांना दिल्या.

जि. प. च्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा सभापती तथा उपाध्यक्ष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी समिती सदस्य सावी लोके, स्वरुपा विखाळे, सुजाता हळदिवे, सोनाली कोदे, अनुप्रीती खोचरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जि. प. मार्फत गेली तीन-चार वर्षे यशस्वीपणे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरविले जात आहे. गतवर्षी जागेच्या उपलब्धते अभावी प्रदर्शन होऊ शकले नाही. यावर्षी मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरविण्याचे. निश्चित करण्यात आल्याचे उपाध्यक्ष देसाई यांनी जाहीर केले. कुडाळ नवीन एसटी डेपोसमोरील पटांगणावर हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया व प्रशासकीय बाबींची पूर्तता दोन महिन्यात करण्यात यावी आणि आतापासूनच पूर्वतयारीला लागा, अशा सूचना खातेप्रमुखांना दिल्या.

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱया वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवडीच्या शिफारशी सदस्यांनी लवकरात लवकर देण्याच्या सूचना उपाध्यक्षांनी दिल्या. यावर्षी निधी अखर्चित राहू नये, यासाठी आचारसंहिता कालावधीत प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या.

चांदा ते बांदा या योजनेंतर्गत कुकुट पालन लाभार्थ्यांची निवड झालेली असून वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. सावंतवाडीत पालकमंत्र्याच्या हस्ते 19 लाभार्थ्यांना वाटप करून शुभारंभ करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.

Related posts: