|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करा!

सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करा! 

सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी

जि.प.कृषी समिती सभा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये यावर्षी सतत अतिवृष्टी होत असल्याने भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करत न बसता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱयांना सरसकट भातपीक शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, असा महत्वपूर्ण ठराव जि. प. च्या कृषी विकास समितीच्या सभेत करण्यात आला.

जि. प. कृषी विकास समितीची सभा सभापती तथा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य संजय देसाई, समिधा नाईक, अनुप्रीती खोचरे, सायली सावंत, कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या-दुसऱया आठवडय़ात अतिवृष्टी होऊन भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसतानाच पुन्हा जिल्हय़ात अतिवृष्टी होऊन उरल्या-सुरल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात आता ग्रामसेवक संपावर गेले असल्याने पंचनामे करणेही थांबले आहे. त्यामुळे पंचनामे नाही झाले तर शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळणार कशी, असा प्रश्न सदस्यांनी केला असता पाऊस सतत सुरुच असल्याने शेती पूर्ण गेली आहे. त्यामुळे पंचनामे करत न बसता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट भात पिकाची नुकसानी शेतकऱयांना द्यावी, असा ठराव करून शासनाला पाठविण्याचे ठरविण्यात आले.

वन्यप्राण्यांपासून भातपीक तसेच फळपिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आणि वन्यप्राण्यांपासून शेतीची नुकसानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वनखात्याने कराव्यात, अशा सूचना उपाध्यक्ष देसाई यांनी दिल्या.

कृषी विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ सर्व शेतकऱयांना मिळावा, वेळीच खरेदी व्हावी, यासाठी सदस्यांनी लाभार्थी निवडीच्या शिफारशी लवकरात लवकर द्याव्यात आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत खरेदी केल्यास आचासंहिता संपातच लाभार्थी शेतकऱयांच्या बंक खाती अनुदान जमा करण्यात येईल, असे उपाध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले.

कृषी समितीच्या सभेला अनेक खातेप्रमुखांनी दांडय़ा मारल्या. त्यामुळे उपाध्यक्षंानी खातेप्रमुखांच्या उपस्थितीची झाडाझडती घेतली. विशेषत: राज्यस्तर कृषी विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त करत पुढील सभेला अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांच्या केबिनमध्येच जाऊन सभा घेण्यात येईल, असा इशारा उपाध्यक्षांनी दिली. खातेप्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱयांना कळवून योग्य ती कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या.

Related posts: