|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तान पुन्हा तोंडघशी

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी 

‘युएन’मध्ये काश्मीर मुद्यावर झटका : भारताबरोबर चर्चेचा दिला सल्ला

जिनिव्हा / वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये (युएन) काश्मीर मुद्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. मानवाधिकार परिषदेत भारताचे अधिकारी विजय ठाकुर सिंह यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे, असे विजय ठाकूर सिंह यांनी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला भारताबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा जोरदार झटका मिळाला आहे.

काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तान वारंवार करत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र परिषदेच्या मानवाधिकार समितीने ही मागणी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावत चर्चेसाठी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी सदस्य मलीहा लोधी आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ग्युटेरेस यांच्यात प्रत्यक्ष चर्चा झाली असून त्यात काश्मीरचा मुद्दाही उपस्थित झाला. काश्मीरमधील परिस्थितीवरून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी ग्युटेरेस यांनी दोन्ही बाजूंना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केल्याचे ग्युटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांना काश्मीरवरून भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाची चिंता आहे. मागच्या महिन्यात फ्रान्समध्ये जी-7 परिषदेच्या निमित्ताने अँटोनिओ ग्युटेरेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासोबत सुद्धा त्यांचे बोलणे झाले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे मुख्य प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारताकडून यापूर्वीच भूमिका विषद

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारताने काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असून तिसऱया देशाचा हस्तक्षेप मंजूर नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानला काश्मीर आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवून यामध्ये हस्तक्षेप घडवून आणायचा आहे. त्यासाठी विविध देशांमार्फत दबावही टाकला जात आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोरच काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे. आताही काश्मीरसंबंधी भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारताचे पाकिस्तानला सणसणीत उत्तर

संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱया पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे, असे विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले. तसेच काश्मीरमधील जनतेच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: