|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » ऍशेस जिंकण्यासाठी कांगारु सज्ज

ऍशेस जिंकण्यासाठी कांगारु सज्ज 

यजमान इंग्लंडविरुद्ध  पाचवी व शेवटची कसोटी आजपासून

लंडन / वृत्तसंस्था

2001 नंतर इंग्लिश भूमीत पुन्हा एकदा ऍशेस जिंकण्यासाठी कांगारु सज्ज झाले असून या मालिकेत इंग्लंडचा कर्दनकाळ ठरत आलेला स्टीव्ह स्मिथ इथेही यजमान संघाच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. वास्तविक, स्मिथ मैदानात उतरल्यानंतर इंग्लिश चाहत्यांनी त्याची हुर्योच उडवली. पण, त्यानेही तोडीस तोड उत्तर देत खेळावरील आपली हुकूमत सातत्याने अधोरेखित केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, येथील पहिल्या दिवसाच्या खेळाला दुपारी तीन वाजता सुरुवात होईल.

या लढतीसाठी इंग्लंडने जेसॉन रॉय, क्रेग ओव्हर्टन यांना वगळत सॅम करन, ख्रिस वोक्सला संधी दिली आहे तर ऑस्ट्रेलियाने ट्रव्हिस हेडऐवजी मिशेल मार्शला संघात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम पेनच्या नेतृत्वाखालील जिद्दी ऑस्ट्रेलियाने ओल्ड ट्रफोर्डवर मालिकेत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आणि ते ऍशेस कायम राखतील, हे देखील तेथेच निश्चित झाले. अर्थात, किमान ही मालिका बरोबरीत राखायची असेल तर वर्ल्डकप जेत्या इंग्लंडला सर्वप्रथम स्टीव्ह स्मिथला स्वस्तात बाद करावे लागेल. स्मिथने या मालिकेतील 5 डावात चक्क 134 च्या सरासरीने विक्रमी 671 धावा झोडपल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मानांकन यादीत अव्वलस्थानी असणाऱया स्मिथने येथे 3 शतके व 2 अर्धशतके झळकावली असून मँचेस्टरमध्ये त्याने शानदार द्विशतक झळकावले. याशिवाय केवळ मार्नस लाबुशेननेच फलंदाजीत सातत्य दाखवले आहे.

दक्षिण आफ्रिकेत गतवर्षी मार्चमध्ये चेंडू कुरतडल्याप्रकरणी एका वर्षाचे निलंबन पूर्ण केल्यानंतर स्मिथसाठी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती आणि त्यात त्याने आपल्या लौकिकापेक्षाही साजेसा खेळ साकारला. जोफ्रा आर्चरच्या एका जीवघेण्या बाऊन्सरवर जायबंदी झाल्यानंतर त्याला तीन डावात खेळता आले नाही. पण, तरीही त्याने अन्य कोणापेक्षाही सरस कामगिरी साकारत आपला ठसा उमटवला.

त्याचा एकंदरीत फॉर्म पाहता, पूर्ण मालिका खेळण्याची संधी लाभली असती तर तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या 1930 मधील 974 धावांचा विक्रमही सहज मोडीत काढू शकला असता. ऑस्ट्रेलियासाठी याशिवाय जोश हॅझलवूड व पॅट कमिन्स यांची भेदक गोलंदाजीही तितकीच महत्त्वाची ठरली. या उभयतांनी एकत्रित मिळून चक्क 42 बळी घेतले, ते विशेष महत्त्वाचे ठरले.

जो रुटसमोर आव्हानांचा डोंगर

इंग्लंडने या हंगामात प्रथमच आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. तो लौकिक कायम राखण्यासाठी जो रुटला येथे मालिका बरोबरीत राखण्याचे लक्ष्य समोर ठेवावे लागेल आणि यासाठी संघसहकाऱयांना प्रेरणा देणे, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्यावर त्याला भर द्यावा लागेल. यामुळे, ही कसोटी रुटसाठी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील अपयशामुळे रुटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पण, मावळते प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांना मात्र त्याचे नेतृत्व कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्सचा 13 सदस्यीय संघात समावेश आहे. पण, ओव्हलवर तो गोलंदाजी करु शकणार नाही, असे सध्याचे संकेत आहेत. या इंग्लिश उपकर्णधाराने ओल्ड ट्रफोर्डवर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात गोलंदाजी केली नव्हती. स्टोक्स गोलंदाजी करु शकत नसेल तर तो फक्त स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात असेल. यामुळे, सॅम करन संघात आला असून फलंदाजीत झगडत असलेल्या जेसॉन रॉयला कदाचित बाहेर व्हावे लागले आहे.

स्टोक्स या मालिकेत इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज असून त्याने आतापर्यंत 354 धावांचे योगदान दिले आहे. त्याच्याशिवाय, रोरी बर्न्सचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज सातत्यपूर्ण फलंदाजी करु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

संभाव्य संघ

इंग्लंड : रोरी बर्न्स, जो डेन्ली, बेन स्टोक्स, जो रुट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, ख्रिस वोक्स, सॅम करण, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.

ऑस्ट्रेलिया : मार्कस हॅरिस, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, टीम पेन (कर्णधार-यष्टीरक्षक), जोश हॅझलवूड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, पीटर सिडल.

भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 3 पासून.

 

Related posts: