|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपहरणाचा एका दिवसात छडा; आरोपी जेरबंद

अपहरणाचा एका दिवसात छडा; आरोपी जेरबंद 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील मंगळवार पेठेतील विशाल यशवंत पिलावरे यांचे 7 ते 8 अज्ञात महिला व पुरुषांनी अपहरण करत 2 लाखाची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास त्यांना मारुन टाकण्याची धमकी अपहरणकर्ते देत होते. ही घटना दि. 9 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान घडली होती. याबाबत दि. 10 रोजी पिलावरे यांच्या पत्नी मेघा विशाल पिलावरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासाची सूत्रे हलवत या गंभीर गुन्हय़ाचा छडा लावण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. याप्रकरणी नवी मुंबईच्या पाच आरोपींना जेरबंद केले असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वांना उद्या गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मेघा पिलावरे रा. 59 मंगळवार पेठ, सातारा यांचे पती विशाल पिलावरे यांचे दि. 9 रोजी सायंकाळी 7 ते 8 अज्ञात महिला व पुरुषांनी अपहरण केले व त्यांना अज्ञात ठिकाणी कोंडून ठेवून मारहाणही सुरु केली होती. त्यानंतर या अपहरणकर्त्यांनी मेघा पिलावरे, त्यांची नणंद स्वाती मोरे व सरिता माने यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करत 2 लाख रुपयांची खंडणी मागणे सुरु केले. खंडणी न दिल्यास विशाल पिलावरे यांना मारण्याची धमकी अपहरणकर्ते देत होते.

या सर्व प्रकारामुळे पिलावरे कुटुंबिय हवालदिल झाले होते. मेघा पिलावरे यांनी शेवटी दि. 10 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. झालेल्या प्रकाराची माहिती पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांना दिल्यानंतर त्यांची रितसर तक्रार दाखल करुन घेण्यात आली. अपहरणकर्ते दोन मोबाईल क्रमांकावरुन सतत खंडणीची मागणी करुन विशाल पिलावरे यांना मारुन टाकण्याची धमकी देत असल्याने या गंभीर गुन्हय़ाची पाटील यांनी तातडीने दखल घेत सूत्रे हलवली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी  भेट देवून तपासाबाबत सूचना केल्या होत्या.

शाहूपुरी पोलिसांनी उपलब्ध मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपासास प्रारंभ केल्यानंतर काही दुवे हाती आल्यानंतर एक तपास पथक तयार करुन मुंबईला प्रयाण केले. या तपास पथकाने मुंबईतील अपहरणकर्त्यांचा मोठय़ा शिताफीने शोध घेवून कृष्ण प्रभुनाथ ठाकूर (वय 28) व संजय अशोक शर्मा (वय 36), नितीन बाळासो जगताप (वय 31), महानंदा रामवृक्ष विश्वकर्मा (वय 42), महादेव लक्ष्मण गडदे (वय 34), सर्व रा.महात्मा फुलेनगर, गणपती वाडा, दिघा, नवी मुंबई यांना ताब्यात घेतले. त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले करत आहेत.  

विशाल पिलावरे सुखरुप

या पाचही आरोपींनी साताऱयातून विशाल पिलावरे यांचे अपहरण केले होते.  त्यांना नवी मुंबईत ज्या ठिकाणी अपहरणकर्त्यांनी कोंडून ठेवले होते. त्या ठिकाणाहून त्यांची सुटका करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. त्यांना सुखरुपपणे साताऱयात आणले आहे.

शाहूपुरी ठाणे व एलसीबीच्या पथकाची कारवाई

गुन्हय़ाचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याची एक टीम व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम अशा दोन टीमने नवी मुंबईत जावून या पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. केवळ एक दिवसाच्या आत अपहरण व खंडणीसारख्या गंभीर गुन्हय़ाचा छडा लावत या दोन्ही टीमने अभिनंदनीय कामगिरी बजावली आहे.

Related posts: