|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास कलेचे सोने होते

कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास कलेचे सोने होते 

वार्ताहर/ पणजी

सर्वांच्या अंगी कला असते, पण तिला योग्य मार्गदर्शन, व्यासपीठ व प्रोत्साहन मिळाले पाहिजे. कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास कलेचे सोने होते, असे प्रतिपादन पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी केले.

मेरशी येथील मेरशी सांस्कृतिक ट्रस्टच्या सार्वजनिक गणेशोत्सवात ते बोलत होते. कै. अर्जुन व कै. लिला अर्जुन नाईक यांच्या स्मरणार्थ समाजकार्यकर्ते देवानंद अर्जुन नाईक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल गोवा सिने नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मडकईकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे माजी सचिव विनोद नार्वेकर, देवानंद अर्जुन नाईक, माजी अध्यक्ष तथा मडगाव अर्बन बँकेचे चेअरमन किशोर नार्वेकर, अजित नाईक उपस्थित होते. स्पर्धेचे पुरस्कर्ते देवानंद अर्जुन नाईक म्हणाले की कलाकारांना प्रोत्साहन देण्यात आपल्याला समाधान मिळते. कलाकारांनी प्रेरणा घेऊन परिश्रमपूर्व पुढे गेल्यास एक दिवस तीच कला त्याना यशोशिखरावर नेणार आहे. स्पर्धा पुरस्कृत करणारे अनेकजण असतात, मात्र त्यांचे आयोजन यशस्वीपणे केले पाहिजे आणि मेरशी सांस्कृतिक ट्रस्ट ते करत आलेले आहे.

सुरुवातीस ट्रस्टचे चेअरमन डॉ. वासुदेव पै यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दामोदर केरकर यांनी तर श्री सातेरी देवस्थानचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेतील वरिष्ठ गटातील विजेते पुढील प्रमाणे : प्रथम ओमकार कलवार, द्वितीय नवमी नाईक, तृतीय अश्वेत पिळर्णकर, चतुर्थ खुशी ठाकुर, पाचवे श्रेया नाईक, सहावे रुपल वेर्णेकर.

कनिष्ठ गटातील विजेते : प्रथम सावली ठाकूर, दुसरे कन्या नाईक, तिसरे दिशा देसाई, चौथे तेजल वेर्णेकर, पाचवे अनुक्षा मोरजकर, सहावे शिविजा आळवे.