|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाहतूक नियमांचा खड्डय़ांशी काहीही संबंध नाही

वाहतूक नियमांचा खड्डय़ांशी काहीही संबंध नाही 

नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

नवीन वाहतूक नियमांची गोव्यात तातडीने अंमलबजावणी करावी. रस्त्यावर खड्डे पडले आहेत म्हणून ते नियम लागू करण्यास टाळाटाळ करु नये, असे निवेदन माजी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. खड्डे आणि नवीन वाहतूक नियम यांचा परस्परांशी संबंध नाही, असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची विविध निर्णयाबद्दल त्यांनी तोंड भरुन स्तुती केली.

पणजीत काल बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ढवळीकर यांनी वरील मागणी केली.

नियमांचा खड्डय़ांशी काहीही संबंध नाही

ढवळीकर यांनी पुढे सांगितले की, वाहतूक कायद्यात दुरुस्ती करुन जे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत त्यांची कार्यवाही 7 राज्यांनी चालू केली आहे. गोव्यात ते नियम डिसेंबरपासून लावले जातील असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणतात. परंतु ते चुकीचे आहे. रस्त्यावर खड्डे पडले म्हणून ते नियम पुढे ढकलण्याची कृती योग्य नाही. नियमांचा खड्डय़ांशी काहीही संबंध नाही. वाहतुकीत शिस्त यायची असेल तर नियमांची तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. आपण वाहतूकमंत्री असताना केलेल्या सर्व सूचना नवीन वाहतूक कायदा नियमांत समाविष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.

सर्वांना विश्वासात घेऊनच नवे नियम

नवीन वाहतूक कायदा – नियम तयार करुन घेण्यासाठी गेली 3 वर्षे खर्ची घालण्यात आली आहेत. त्याकरीता काही राज्याच्या वाहतूकमंत्र्यांची समिती नेमण्यात आली होती. त्यात आपण होतो. या समितीने अनेक राज्यांना भेटी देऊन तेथील वाहतूकमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. तसेच इतर सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात आली होती. सर्वांना विश्वासात घेऊनच हा कायदा – नवीन नियम तयार करण्यात आले आहेत.

नियम मोडणाऱया सर्वांनाच शिक्षेची तरतूद

 नव्या वाहतूक नियमांमध्ये वाहनांचे विक्रेते, वितरक, कंपनीसह त्यांचे सल्लागार, इंजिनियर्स – कंत्राटदार अशा सर्वांनाच शिक्षेची तरतूद आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही म्हणून राज्य सरकारने त्वरित ते नियम लागू करावेत. त्यानुसार दंडाची रक्कम कमी करण्याचे अधिकार राज्यांना आहेत. त्याचा विचार सरकारने करावा, असे ढवळीकर यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन

तीनवेळा तलाक, इस्त्रोचे चंद्रयान, जम्मू – काश्मीरचे 370 कलम याबाबतचे निर्णय अभिनंदनीय आहेत, असे सांगून ढवळीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व केंद्रीय मंत्रिमंडळाचे कौतुक केले.

पूरग्रस्तांना घरे बांधून द्यावी

म्हादई प्रश्नी न्यायालयाने दिलेल्या निकालाची कार्यवाही झाली पाहिजे. त्याबाहेर वेगळी चर्चा करण्याची व तोडगा काढण्याची गरज नाही. डॉ. सावंत यांनी ते करु नये, असे मत ढवळीकर यांनी प्रकट केले. पावसात ज्यांची घरे कोसळली त्यांना त्यांची घरे बांधून देण्याचे काम सरकारने करावे, अशी मागणी त्यांनी केली. पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई दिली म्हणून डॉ. सावंत यांची ढवळीकर यांनी प्रशंसा केली तथापि, सर्वांना त्याचा लाभ मिळायला हवा, असेही ते म्हणाले.

Related posts: