|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांच्या निरोपासाठी शहर सज्ज

बाप्पांच्या निरोपासाठी शहर सज्ज 

प्रतिनिधी/     बेळगाव

शहरात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र गणेशमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, गणरायांना निरोप देण्याचा दिवस आज येऊन ठेपला आहे. महापालिकेच्यावतीने शहर आणि उपनगर परिसरातील तलाव आणि विहिरी विसर्जनासाठी सज्ज करण्यात आल्या असून तलाव परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. श्री विसर्जनासाठी सकाळी दहापासून क्रेन सुविधा उपलब्ध राहणार आहे.

गणरायांना निरोप देण्यासाठी महापालिकेने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. कपिलेश्वर मंदिराजवळीत दोन्ही तलावांमधील पाणी काढून त्यात नव्याने पाणी सोडण्यात आले आहे. यापैकी जुन्या कपिलेश्वर तलावाची स्वच्छता करून नव्याने पाणी भरण्यात आले होते. पाचव्या दिवसापासून तलाव विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. परिसर स्वच्छ करून विद्युतदिपांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनासाठी 10 क्रेन उपलब्ध केल्या आहेत. सुरक्षेसाठी लाईफ गार्ड तैनात करण्यात येणार आहेत.

 विसर्जन तलावांची रंगरंगोटी करून गणपती विसर्जनासाठी सज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने तलाव आणि विहिरींचा परिसर झगमगत आहे. रामेश्वर तलावात श्रीगणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी 2 क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कणबर्गी तलावाजवळ महापालिकेच्यावतीने एक क्रेन तैनात करण्यात येणार आहे. उर्वरित 7 क्रेन कपिलेश्वर तलावाजवळ उपलब्ध राहणार आहेत. तलाव स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱयांसह विसर्जनाकरिता अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक घेऊन जबाबदाऱया सांगून विसर्जन पूर्ण होईपर्यंत तलाव परिसरात थांबण्याचा आदेश आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बजावला आहे.

 या ठिकाणी होणार श्री विसर्जन

  • कपिलेश्वर तलाव
  • कपिलतीर्थ (नवीन तलाव)
  • रामेश्वरतीर्थ (जक्कीनहोंड तलाव)
  • जुने बेळगाव कल्मेश्वर तलाव
  • अनगोळ, लाल तलाव
  • कणबर्गी तलावाशेजारील कुंड
  • किल्ला तलावाशेजारील विहीर
  • नाझर कॅम्प, वडगाव तलाव