|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जनतेला लुटणारे गजाआड होणारच!

जनतेला लुटणारे गजाआड होणारच! 

रांची / वृत्तसंस्था :

झारखंड विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी रांची येथे पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर गुरुवारी जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. जनतेला लुटणाऱयांना योग्यठिकाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. काही लोक गजाआड झाले आहेत. देशाचा कायदा आणि न्यायालयापेक्षा आपण वरचढ असल्याच्या आविर्भावात राहणारे लोक आज जामिनासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत. ही तर केवळ सुरुवात असून 5 वर्षे शिल्लक आहेत. हा तर केवळ ट्रेलर असल्याचे म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.

अद्याप अनेक संकल्पांची पूर्तता शिल्लक असून प्रचंड परिश्रम करायचे आहेत. लोकांना काम करणारे आणि दमदार सरकार देणार असल्याचे आश्वासन निवडणुकीवेळी दिले होते. मागील 100 दिवसांमध्ये देशाने याचे ट्रेलर पाहिले आहे. दहशतवाद विरोधात निर्णायक लढाईचा आमचा संकल्प आहे. यानुसार पहिल्या 100 दिवसांमध्येच दहशतवादविरोधी कायदा अधिकच सक्षम करण्यात आल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

आदिवासी समुदायासाठी योजना

आदिवासी समुदायातील मुलांकरता देशभरात 462 एकलव्य शाळा सुरू केल्या जात आहेत. या शाळांमध्ये मुलांचे शिक्षण, क्रीडाप्रकार, कौशल्यविकास, स्थानिक कला आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीही सुविधा असणार आहेत. सरकार प्रत्येक आदिवासी मुलाकरता दरवर्षी 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च करणार असल्याचे मोदी म्हणाले.

जलमार्गाचा शुभारंभ

पंतप्रधानांनी साहिबगंज मल्टीमॉडेल टर्मिनलचे उद्घाटन केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण क्षेत्राला वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. जलमार्गाने झारखंड पूर्ण देशाशीच नव्हे तर जगाशीही जोडला जाणार आहे. या टर्मिनलमुळे आदिवासी बंधूभगिनी, येथील शेतकरी स्वतःच्या उत्पादनांना देशभरातील बाजारपेठेत सहजपणे पोहोचवू शकतील. जलमार्गामुळे उत्तर भारतातून झारखंडसह ईशान्येतील राज्यापर्यंत धान्य पोहोचविणे अधिकच सुलभ होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

योजनांचे लाँचिंग पॅड

झारखंड हे राज्य गरीब आणि आदिवासींच्या हिताकरता मोठय़ा योजनांचे लाँचिंग पॅड ठरले आहे. याच झारखंडमधून जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान’चा प्रारंभ झाला होता. देशातील कोटय़वधी शेतकऱयांना निवृत्तिवेतन सुनिश्चित करणारी पंतप्रधान किसान मानधन योजनेचा शुभारंभही झारखंडमधून होतोय. देशाच्या कोटय़वधी व्यापारी आणि स्वयंरोजगारधारकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेची सुरुवातही झारखंडमधून होत असल्याचे मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदींनी गुरुवारी राज्यातील नव्या विधानसभा भवनाचे उद्घाटन केले आहे.

 

 

Related posts: