|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ 

उत्तम काटकर/  एकसंबा :

भिंत खचली, चूल विझली, होते-नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. ‘कणा’ या कवितेतील या ओळींची आठवण व्हावी असा निसर्गाचा कोप सध्या होऊन गेला. आपण पृथ्वीवर असलेल्या सुंदर निसर्गाचा दिवसेंदिवस ऱहास करीत आहोत. याला मानवाची दांभिकता किंवा ढोंगीपणाच म्हणावा लागेल.

आपल्याकडे जे आहे, त्याचा नाश करून नसत्याच्या मागे पळण्यामध्ये माणसाला वैज्ञानिक प्रगती केल्याचा आनंद मिळत आहे. प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावत आहेत. या सर्वांवर निसर्गाचे संगोपन हा एकच उपाय आहे. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला, आपले संगोपन केले, आपल्या प्रगतीचा सोबती झाला, त्याच निसर्गाकडे आपला विनाश करण्याचीही ताकद आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे म्हटले जाते. निसर्ग आपत्तीमुळे लाखो लोकांना संकटात सोडले, अनेकजण जीवास मुकले, या आपत्तीने देशाचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे. मन सुन्न करणाऱया, मन हेलावणाऱया बातम्या, फोटो पाहताच दु:ख, हळहळ व्यक्त करतो आणि निसर्गाने आपले रौद्ररुप दाखविले असे म्हणतो. निसर्ग का कोपला? पूरस्थिती का उद्भवली? धरणांच्या व्यवस्थापनात त्रुटी होत्या का? शेतात पूररेषांची पर्वा न करता घरे का बांधली, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

आज गरज आहे, मदत सुसंघटितपणे करण्याची. जबाबदार कोण, त्याची जबाबदारी कोणती, ती कोणी निश्चित करायची हे प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. गरज आहे ती फक्त पुनर्वसनाचे कार्य करण्याची. त्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज करणे, अडचणींचा निपटारा करणे, त्यासाठी योग्य ते निर्णय घेणे, पूर्वीच्या निर्णयात बदल करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. यासाठी योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड करणं आणि धडाडीने निर्णय घेणारे नेतृत्व गरजेचे आहे.

Related posts: