|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑनलाईन फसवणुकीच्या प्रयत्नांचा महापूर

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रयत्नांचा महापूर 

महेश शिंपुकडे /निपाणी :

सध्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण सहजतेकडे अधिकतर आकर्षित होत आहे. यातून दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला अधिकतर पसंती दिली जात आहे. यासाठी आकर्षक जाहिराती, सवलत योजना ही देखील कारणे आहेत. ऑनलाईन खरेदीसाठी काही नामांकीत कंपन्यांनी आपली विश्वासर्हता जपली आहे. तर काही फसव्या कंपन्या याचा गैरफायदा उठवून ग्राहकांची लूट करत आहेत. यातून सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रयत्नांचा महापूर आल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

फसवे फोन कॉल्स, मॅसेजसह सरळ पोस्टातून धाडल्या जाणाऱया पत्रातून ही फसवणूक सुरू आहे. लाख, कोटी रुपयांचे बक्षीस लागले, अलिशान कारचे आपण विजेते ठरलात, नामांकीत कंपनीत मोठय़ा पगाराची नोकरी तुम्हाला मिळाली, अशी आमिषे दाखविली जात आहेत. एखादा ग्राहक अशा बक्षीसाच्या लालसेतून आकर्षित झाला व संपर्क साधल्यास विविध कारणे पुढे करून बक्षीस देण्याऐवजी प्रथम थोडी थोडी करत मोठी रक्कम लाटली जाते. पण ज्यावेळी खिसे रिकामे होतात. त्यावेळी फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच काहीच करता येत नाही. कारण रक्कम लुटेपर्यंत येणारे फोन कॉल्स बंद होतात व ग्राहकाने संपर्क साधल्यानंतरही काहीच उपयोग होत नाही.

निपाणी येथील उद्योजक शहा यांना नुकतेच पोस्टाद्वारे पत्र मिळाले आहे. ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवसायातील नामांकीत कंपनीच्या नावाचा वापर करून हे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये शहा यांना 1 लाखाचे बक्षीस खरेदी केल्याच्या मोबदल्यात तुम्हाला मिळाले आहे. यासाठी एक क्रॅशकार्डही असून यामध्ये एसएमएस कोड देण्यात आला आहे. यावर संपर्क साधताच बक्षीस मिळणार आहे, असे सुचित करण्यात आले आहे.

चौकस बुद्धीतून याविषयीच्या नावाचा वापर केलेल्या नामांकीत कंपनीकडे चौकशी केली असता अशा प्रकारे खरेदीवर बक्षीस योजना आजपर्यंत कंपनीने जाहीर केलेली नाही, असे सांगितले. यातून बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी ग्राहकांनी सजग होणे गरजेचे आहे.