|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करा

पूरग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करा 

प्रतिनिधी /निपाणी :

कर्नाटकातील पूरग्रस्तांच्या बाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकारने अत्यंत दुर्लक्ष केले आहे. कोणत्याही प्रकारचे सहाय्य आजतागायत देण्यात आलेले नाही. माणुसकीला लाजवेल अशा प्रकारच्या यातना पूरग्रस्त अनुभवत आहेत. याची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी योग्य प्रकारचे सहाय्य तातडीने करावे, अशा मागणीचे निवेदन निपाणीत चिकोडी जिल्हा काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठवून देण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार काका पाटील म्हणाले, गेल्या दीड महिन्यात उत्तर कर्नाटकात महापुराने थैमान घातले. अशावेळी संसार उघडय़ावर पडलेल्या पूरग्रस्तांना तातडीने मदत करणे आवश्यक असताना याबाबतीत केंद्र व राज्य सरकारने मात्र गेंडय़ाची कातडी पांघरल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ठिकाणी दहा हजार रुपये सहाय्य दिले, त्याठिकाणी कर्जवसुली करण्यात आली. ही गंभीर बाब असून येत्या महिन्याभरात पूरग्रस्तांना योग्य सहाय्य न मिळाल्यास मोठा मेळावा घेऊन सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनीही मनोगत व्यक्त केले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निवेदनाचे वाचन केले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात, महापुरामुळे पूरग्रस्तांना दैनंदिन जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे, अशी अवस्था असतानाही केंद्र सरकारकडून राज्याला कोणतेही सहाय्य मिळालेले नाही. या काळात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांनी नाममात्र भेटी दिल्या. परंतु या परिस्थितीचे गांभीर्य त्यांना झालेले दिसत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी योग्य सहाय्य त्वरित द्यावे, अशा प्रकारचे आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी निवेदनात राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

Related posts: