|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘बाप्पा’ पुढच्या वर्षी लवकर या!

‘बाप्पा’ पुढच्या वर्षी लवकर या! 

वार्ताहर /निपाणी :

गणपती बाप्पा मोरया, गणेश-गणेश मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया-मोरया असा जयघोष करत पण भावपूर्ण अंतःकरणाने गुरुवारी गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी विघ्नहर्त्या गणरायाला बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे नम्र आवाहनही भाविकांनी केले.

गेल्या 11 दिवसांपूर्वी भक्तांच्या भेटीला आलेल्या गणरायाने निरोप घेतला. गेल्या महिन्यात आलेल्या आस्मानी संकटातून प्रलयकारी महापूर आला. यातून अनेक कुटुंबे उघडय़ावर पडली. न भूतो असे शेती पिकांचे नुकसान झाले. याची छाया यंदाच्या गणेशोत्सवावर पडली. अनेक सार्वजनिक मंडळांनी उत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळताना पूरग्रस्तांना मदत केली. यामुळे यंदा महापुराच्या संकटाने गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश सफल करण्यास मदत केली.

निपाणी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. या विसर्जन मिरवणुकांमध्ये कोठेही डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला नाही. तर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्यांचा गजर यातून सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीच्या माध्यमातून जाताना शहराबाहेर असणाऱया विहिरीमध्ये मूर्तीचे विसर्जन करताना भावपूर्ण अंतःकरणाने पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन बाप्पांच्या चरणी भाविकांनी केले.

Related posts: