|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत नौदल रक्षकाचा खूनात एका रक्षकाला अटक

वास्कोत नौदल रक्षकाचा खूनात एका रक्षकाला अटक 

प्रतिनिधी /वास्को :

नौदलाच्या दोघा सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन एकाच्या खुनात होण्याची घटना बुधवारी रात्री वास्को चिखली येथील नौदलाच्या आवारात घडली. खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव व्ही. एम. सिंग (50) असे आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षक स्वामीनाथन मणी (53) याला वास्को पोलिसांनी अटक केली आहे.

वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 9. 30 च्या सुमारास आल्त चिखली येथील नेव्हल आर्मामेंट डेपोत ही घटना घडली. या डेपोच्या प्रवेशद्वारावर नौदलाचे सुरक्षा रक्षक व्ही. एम. सिंग व स्वामीनाथन मणी हे तैनात होते. रात्री ते नऊच्या सुमारास एकत्र जेवलेही होते. त्यानंतर बॅरॅकमध्ये त्यांचे शुल्लक कारणावरून बिनसले. त्यांच्यात वाद निर्माण होऊन हातघाई झाली. रागाच्या भरात मणी यांने सिंग याच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार केला. या प्रहारामुळे तो जमिनीवर कोसळला. साधारण दोन तासांनी ही घटना उघडकीस आली. नौदलातील इतर कर्मचाऱयांना सिंग हा सुरक्षा रक्षक रक्ताच्या थारोळय़ात पडलेला दिसला. त्यामुळे या घटनेची माहिती त्यांनी नौदलाच्या इतर अधिकाऱयांना दिली. नौदल कर्मचाऱयांनी जखमी सुरक्षा रक्षकाला वास्कोतील आयएनएस जीवंती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सदर सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटने प्रकरणी गुरूवारी सकाळी नौदल अधिकारी विनय अमरनाथ मिश्रा यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली. वास्को पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संशयित आरोपी स्वामीनाथन मणी याला खून प्रकरणी अटक केली आहे. तो मूळ तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हय़ातील असून सध्या त्याचे वास्तव्य आयएनएस जीवंती वास्को येथे होते. मयत सिंग हा उत्तर प्रदेशातील असून त्याचे वास्तव्यही आयएनएस जीवंती वास्को येथे होते.

Related posts: