|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आवश्यकतेनुसारच पदे भरण्याचा निर्णय

आवश्यकतेनुसारच पदे भरण्याचा निर्णय 

प्रतिनिधी /पणजी :

सरकारी नोकरी भरतीच्या जाहिराती दिल्या असल्या तरी ही नोकरभरती एका वर्षासाठी नसून पाच वर्षासाठी आहे. जाहिराती दिल्या म्हणून एकाच वेळी एवढी नोकरभरती होणार नाही. आवश्यकता असेल त्याप्रमाणे नोकरभरती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य खात्यातील नोकरभरतीसह अन्य खात्यातील नोकरभरतीलाही यामुळे चाप बसणार आहे. आरोग्य खात्यातील मोठय़ा प्रमाणात नोकरभरती करण्याच्या जाहिरातीमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे नोकरभरतीबाबत सरकार आणि भाजपमध्येही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खऱया अर्थाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना यामुळे मोठी चपराक बसली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप विधीमंडळाची काल गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार तसेच प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व महामंत्री सतीश धोंड यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली. नोकर भरतीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. त्यावर बोलताना आवश्यकतेनुसारच पदे भरली जातील. अत्यंत गरज आहे अशा नोकरभरतीला सरकार प्राधान्य देणार आहे. पाच वर्षासाठीची नोकरभरती एकाचवेळी केली जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक मंत्र्याने आपल्या खात्यावर नियंत्रण ठेवावे व त्यापद्धतीने काम करावे असे सूचित केले. पत्रकारांशी बोलताना ही दर महिन्याला होणारी नियमित बैठक असल्याचे सांगितले. चतुर्थीमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. दर महिन्याला आमदारासोबत बैठक होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.