|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पारंपरिक जल्लोष-उत्साहाचा अनोखा संगम

पारंपरिक जल्लोष-उत्साहाचा अनोखा संगम 

बेळगाव / प्रतिनिधी :

निरोप देतो बाप्पा तुम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही देवा क्षमा असावी….

अशा पंक्ती आळवीत बेळगावकर गणेशभक्तांनी गुरुवारी बाप्पांना जड अंत:करणाने निरोप दिला. गेल्या दहा दिवसांपासून मुक्कामासाठी आलेल्या  गणपतीबाप्पांना निरोप देताना अनेकांची मने जड झाली होती. मात्र, बाप्पांची पाठवणी आनंदाने करण्याच्या परंपरेची जपणूक करत उत्साही वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सुरू झालेला श्री विसर्जनाचा सोहळा शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होता. पारंपरिक जल्लोष आणि उत्साहाचा अनोखा संगम साधत बाप्पांना पुढच्या वषी लवकर येण्याचे आवाहन करण्यात आले.

गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवल्यामुळे मिरवणुकीचा सोहळा शांततेत पार पडला. मिरवणुकीमध्ये बाप्पांचे दर्शन घेण्याचा आनंद लुटण्यासाठी बेळगावसह आसपासच्या परिसरातील भक्तांचे थवे रस्त्यांच्या दुतर्फा ठाण मांडून होते. भव्यदिव्य अशी परंपरा जपणारी श्री विसर्जन मिरवणूक सायंकाळी 5 च्या सुमारास सुरू झाली. त्यावेळी श्री गणेशाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. बँडच्या तालावर तसेच वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक मार्गस्थ झाली.

गणेशोत्सवावर पर्जन्यराजाचा प्रभाव

संपूर्ण गणेशोत्सवावर पर्जन्यराजाचा प्रभाव दिसून आल्यामुळे भक्तवर्गाचा काहीप्रमाणात हिरमोड झाला. बाप्पांचे मनसोक्त दर्शन घेण्याची संधी अनेक भक्तांना लाभली नव्हती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीद्वारे बाप्पांचे दर्शन घेऊन ही कसर भरून काढण्याचा मनोदय व्यक्त होत होता. त्याचवेळी ढग दाटून आल्यामुळे जोरदार पावसाचा मारा होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र गणेशभक्तांना हलक्मया सरींनी भिजवून टाकत बाप्पांनी उत्साहाचा आणि आनंदाचा सोहळा अधिकच आनंददायी बनविला. अधूनमधून होणाऱया हलक्मया सरींच्या माऱयामुळे वातावरण अधिकच प्रफुल्लित झाले होते. पावसाच्या सरींची कोणतीही तमा न बाळगता भक्तगणांचे थवे रस्त्यांवरून फिरत होते.

मिरवणुकीचा प्रारंभ

श्री विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ हुतात्मा चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर, उपायुक्त यशोदा वंटगोडी, एसीपी चंद्राप्पा, एसीपी एन. व्ही. बरमणी, एसीपी महांतेश्वर जिद्दी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी डॉ. कविता योगप्पण्णावर, तहसीलदार मंजुळा नायक यांच्यासह लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गणेशाची आरती करून तसेच श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

 

 

Related posts: