|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शृंगारपूर शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

शृंगारपूर शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे 

वार्ताहर/ संगमेश्वर

वारंवार मागणी करुनही शिक्षक मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संगमेश्वर तालुक्यातील आदर्श केंद्रशाळा शृंगारपूरला ग्रामस्थांनी टाळे ठोकले. या प्रकारांनरत   मध्यस्तीसाठी गेलेल्या केंद्रप्रमुखांना ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काढता पाय घ्यावा लागला. 

   आदर्श केंद्रशाळा शृंगारपूर या सातवीपर्यंतच्या शाळेत 41 विद्यार्थी असून  4 शिक्षक मंजूर आहेत. मात्र, जून 2019पासून केवळ 2 शिक्षक कार्यरत होते. यात पदवीधर शिक्षक नसल्याने तो मिळावा यासाठी ग्रामस्थ शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होते. गणपती सुट्टीनंतर येथील दोन्ही शिक्षकांची बदली झाली आणि खरा गोंधळ सुरु झाला. सुट्टी लागण्यापूर्वी आजूबाजूच्या दोन शाळांमधील शिक्षक तात्पुरते कामगिरीवर येवून मुलांना शिकवत होते. गणपतीची सुट्टी संपल्यानंतर शाळेत एकही शिक्षक हजर झालेला नाही. यामुळे शाळा सुरु होऊनही मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट घेत वस्तूस्थिती सांगितली. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने आक्रमक ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी शाळेलाच कुलूप ठोकले.

हा प्रकार समजताच सकाळी 11.30 वाजता शृंगारपूर केंद्राचे प्रमुख महेश जाधव एक शिक्षक घेवून मध्यस्ती करण्यासाठी गेले. त्यांनी आज एक शिक्षक हजर करत आहोत. सोमवारी दुसरा हजर करतो, असे सांगून हे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. शाळा बंद केल्यावर तुम्हांला जाग आली का, असा सवाल करण्यात आला. दोन्ही शिक्षक एकाचवेळी हजर करा, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून केंद्रप्रमुख आल्या पावली परत फिरले.

दरम्यान, येथे पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचा अभ्यासक्रम बराच मागे राहिल्याचे पालकांनी सांगितले. ज्यावेळी दोन कार्यरत शिक्षक गेले, त्यावेळी शाळेत कुणीही नसताना प्रशासनाने इकडे लक्ष दिले नाही. उलट आम्हीच 2 शिक्षकांना विनंती करुन शाळेत आणल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

एकीकडे पटसंख्येअभावी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. दुसरीकडे शाळेत विद्यार्थी असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षक मिळत नाही.  ग्रामस्थांना शाळेत शिक्षक मिळवा यासाठी आंदोलन करावे लागते. एकूणच शिक्षण विभागाची नेमकी भूमिका तरी काय असा सवाल पालक वर्गाने उपस्थित केला आहे.