|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेर्डी सरपंचपदी सेनेचे पाथरूड!

खेर्डी सरपंचपदी सेनेचे पाथरूड! 

प्रतिनिधी/ चिपळूण

तालुक्यातील राजकारणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱया खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश पाथरूड यांनी राष्ट्रवादीच्या प्रकाश साळवी यांच्यावर मात केली. जयश्री खताते यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या या पदाच्या निवडणुकीत नाटय़मय घडामोडी घडल्या. यावेळी दोन सदस्य अनुपस्थित, तर एका सदस्याने विरोधात मतदान केल्याने दीर्घकाळानंतर खेर्डीवर भगवा फडकला आहे.

  जून महिन्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या पत्नी व खेर्डी सरपंच जयश्री खताते यांच्यावर राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी शिवसेनेला बरोबर घेत अविश्वास ठराव आणला. त्यामुळे शुक्रवारी नायब तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी  तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणीत सुकाई पॅनलकडून प्रकाश साळवी, जरिना चौगुले, तर शिवसेनाप्रणित गाव विकास पॅनलकडून पाथरूड व  विश्वनाथ फाळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र शेवटच्याक्षणी फाळके यांनी  अर्ज मागे घेतला. निवडणूक प्रक्रिया सभेवेळी अर्ज दाखल करणाऱया चौगुले गैरहजर राहिल्या. त्यामुळे थेट लढतीत पाथरूड यांना 8, तर साळवी यांना 7 मते मिळाल्याने एका मताने पाथरूड विजयी झाल्याचे घोषीक करण्यात आले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे.

  निवडणुकीपूर्वी खेर्डीच्या राजकारणात मोठय़ा घडामोडी घडल्या. सरपंचपदासाठी दोन्ही बाजूंनी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला मंजूर होता. मात्र प्रथम संधी आम्हालाच मिळायला हवी यावर शेवटपर्यंत निर्णय न झाल्याने अखेर दोन्ही बाजूंनी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर नाटय़मय घडामोडीना वेग आला. राष्ट्रवादीच्या चौगुले यांनी अर्ज भरूनही त्या गैरहजर राहील्या. तर वडिलांचे निधन झाल्याने माजी सरपंच खताते येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे समसमान बलाबल निर्माण झाले होते. मात्र गुप्त मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या एका सदस्याने विरोधी मतदान केल्याने सेनेला विजय मिळाला.

  गेल्या चौदा वर्षापासून खेर्डीवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते. मात्र अंतर्गत कलहातून शुक्रवारी राष्ट्रवादी तोंडघशी पडला. दीर्घकाळाने ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्यानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोष केला. शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 खेर्डीतील सत्तांतराला खतातेंचाच आशीर्वाद

  आपल्याच लोकांनी त्रास दिल्याने आपण त्यांना त्रास देणार या न्यायानेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी सरपंच निवडणुकीत आम्हाला मदत केली. अदृश्य हाताने नव्हे तर त्यांच्या आशीर्वादानेच हे सत्तांतर घडले, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Related posts: