|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘नेत्रावती’ला अखेर खेडमध्ये थांबा

‘नेत्रावती’ला अखेर खेडमध्ये थांबा 

तीन तालुक्यातील प्रवाशांना मुंबई गाठणे सोयीचे

प्रतिनिधी/ खेड

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱया नेत्रावती एक्स्प्रेसला अखेर खेड रेल्वेस्थानकात शुक्रवारपासून थांबा देण्यात आला आहे. 6 महिने उत्पन्न अनुभवी तत्त्वावर थांबा देण्यात आला असून त्यानंतरच कायमस्वरूपी थांबा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांतील प्रवाशांना मुंबई गाठणे सोयीचे होणार आहे. 

कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खेड रेल्वे स्थानकात खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यांतील प्रवाशांची सतत रेलचेल सुरू असते. मात्र या स्थानकात एकही जलद गाडी थांबत नव्हती. यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होत होती. या नेत्रावती व मंगला एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनी दंडही थोपटले होते. मात्र निराशेपलिकडे पदरात काहीच पडले नव्हते. याप्रश्नी खासदार सुनील तटकरे यांनीही दिल्लीत रेल्वे अधिकाऱयांशी चर्चा करून जलद गाडय़ांना थांबा देण्याबाबत साकडे घातले होते.

अखेर रेल्वे प्रशासनाने या स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा देण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या नेत्रावतीला यापूर्वी कुर्ला, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला होता. शुक्रवारपासून नेत्रावतीला खेडमध्ये अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.

पावसाळी वेळापत्रकानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत तिरूवअनंतपुरमच्या दिशेने जाताना ही एक्स्प्रेस खेड स्थानकात दुपारी 3.56 वाजता दाखल होईल तर मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी दुपारी 12.47 वाजता दाखल होईल. पावसाळय़ानंतर 1 नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रकानुसार ही गाडी तिरूवअनंतपुरमच्या दिशेने जाताना दुपारी 3.53 वा. दाखल होईल तर मुंबईच्या दिशेने जाताना सकाळी 11.50 वाजता दाखल होणार आहे.

राष्ट्रवादी-मनसेकडून स्वागत

शुक्रवारी दुपारी 1.30 च्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेसचे खेड रेल्वेस्थानकात आगमन होताच राष्ट्रवादी व मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते लोकोपायलट व रेल्वे स्थानकप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष स. तु. कदम, शहराध्यक्ष सतिश चिकणे, नगरसेवक अजय माने, नगरसेविका अल्पिका पाटणे, सायली कदम, जि. प. सदस्या नफिसा परकार, तालुका सरचिटणीस अमित कदम, प्रकाश मोरे, राजेश संसारे, मनसेचे संभाजी देवकाते आदी उपस्थित होते.

Related posts: