|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शरद पवार हाच आमचा पक्ष

शरद पवार हाच आमचा पक्ष 

प्रतिनिधी/फलटण

काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षातूनही अनेक दिग्गज नेते भाजपा, शिवसेना वगैरे सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी अक्षरश: रांगेत असताना श्रीमंत रामराजे व राजेगटाने बोलाविलेल्या मेळाव्यात ते पक्षांतर करणार अशी जोरदार चर्चा राज्यभर सुरु होती, तर चॅनल, वृत्तपत्रातूनही अंदाज, आडाखे बांधले जात असताना श्रीमंत रामराजे यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यांच्या अपेक्षा अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. तसेच शरद पवार हाच आमचा पक्ष असल्याचे स्पष्ट करत कोणताही निर्णय न घेता मेळाव्याची सांगता केली.

 श्रीमंत रामराजे व राजेगटाने शुक्रवारी येथील अनंत मंगल कार्यालयात राजेगटाने पदाधिकारी कार्यकर्त्यांचा महामेळाव्याचे आयोजन करून जिह्यातील खंडाळा, कोरेगाव, पाचगणी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रित केल्याने मेळाव्यास जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील, खंडाळय़ाचे माजी सभापती रमेश धायगुडे, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, प्रवीण बोधे, किरण गोरखनाथ शिंदे, लोणंदच्या माजी सरपंच नंदाताई गायकवाड, अजित मोहिते, जितेंद्र जगताप, संजयबापू धुमाळ, हिंदुराव भोईटे यांच्यासह आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत विश्वजितराजे तसेच तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला तरी शरद पवारांना न दुखावता सर्वसामान्यांच्या भल्यासाठी भावनेने नव्हे तर हिमतीने निर्णय घेण्याची ग्वाही देत आपण नगराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि सभापती या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचलो असल्याने आता अपेक्षा नाही. मात्र जे या जिह्याचे नुकसान करणारे आहे ते जिह्याबाहेर घालवून आगामी काळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून आदर्श जपणारा जिल्हा बनविण्याची ग्वाही देत केवळ सत्तेसाठी पक्ष ही संकल्पना आपल्याला मान्य नसल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.

राजकारण, समाजकारणात सक्रिय झाल्यापासून शरद पवार हाच आमचा पक्ष असल्याचे स्पष्ट करत त्यांच्याबद्दल कधीही वेडेवाकडे बोललो नाही, बोलणार नाही. त्यांच्याविषयी नाराजी किंवा दूषणे देऊन कोठेही जाणार नाही. तथापि लोकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रामुख्याने ट्वीटर, व्हॉट्सअप तत्सम साधनांमध्ये गुंतून पडलेल्या युवापिढीला या जिह्याची संस्कृती, परंपरा, बलस्थाने समजावून देऊन त्यांच्या अपेक्षा समजावून घेत तरुण पिढीला जागृकतेने पुढे नेऊन जिह्याच्या विकासात सक्रिय करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.

ज्यांना विकासाची माहिती नाही, लोकांच्या प्रश्नांची ज्यांची बांधिलकी नाही अशा प्रवृत्ती सत्तेत येऊन इतरांना दगड मारण्याचा, विकासाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करीत असतील तर अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सांगत राज्याच्या वाटय़ाचे पाणी अडविताना केवळ फलटणचा किंवा सातारा जिह्याचा विचार न करता कृष्णा खोऱयाच्या दुष्काळी पट्टय़ाला प्राधान्य दिले. त्यावेळी इथल्या प्रकल्पग्रस्तांनी शब्दावर विश्वास ठेवून स्वखुशीने जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प उभे राहिले आणि राज्याच्या वाटय़ाचे पाणी मुदतीत अडविता आले. इतकेच नव्हे तर फेर आढाव्यात राज्याला आणखी 81 टी एम सी पाणी जादा मिळाल्याचे स्पष्ट करीत जिल्हा विकासाला बांधील राहिला पाहिजे. जातीपाती पलीकडे इथे सत्ता राबविली गेली पाहिजे अशी आपली धारणा असून त्यासाठी आपला संघर्ष सुरू असल्याचे सांगत तो सुरूच असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.

 श्रीमंत मालोजीराजेराजे साहेब यांनी कोयनेची उभारणी केली. मात्र उद्घाटनाचे श्रेय इतरांना लाभले. प्रतापगड येथील पुतळा त्यांच्याच प्रेरणेतून उभारला गेला. जिल्हा बँकेची उभारणी फलटणच्या लक्ष्मी सेन्ट्रल बँकेतून झाली. मात्र याठिकाणी मालोजीराजेंचा नामोल्लेख नाही अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून राजघराण्यातील तीन पिढय़ा तालुक्याच्या हिताला बांधील राहिल्या ते केवळ 850 वर्षे इथल्या सामान्य जनतेने राजघराण्याला दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावरच असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

गेल्या 25 वर्षात शेतीला पाणी, औद्योगिक विकास आणि शांतता यासाठी यशस्वी प्रयत्न केले. श्रीराम कारखाना दूध संघ वगैरे संस्था पुन्हा उभ्या केल्या. आता सत्तेच्या माध्यमातून या विकासाची धूळधाण होणार असेल तर योग्य निर्णय घ्यावा लागेल. जिल्हा बँक, जिल्हा परिषद व तत्सम संस्थांच्या माध्यमातून उभी राहिलेली यंत्रणा अबाधित ठेवण्यासाठी सत्तेची सूत्रे योग्य लोकांकडे असली पाहिजेत त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

यासभेत डॉ. बाळासाहेब शेंडे, सोपान जाधव, विनायकराव बेलदार पाटील, शिवाजी लांगूते, वैभव खटके, बजरंग खटके, हिंदुराव भोईटे, सुखदेव बेलदार, कांतीलाल बेलदार, लक्ष्मीताई कराडकर, रेश्मा भोसले, रेश्मा देशमुख वगैरेची भाषणे झाली. प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी आभार मानले.

Related posts: