|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंचे अखेर ठरले

उदयनराजेंचे अखेर ठरले 

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचे वृत्त झळकले,

प्रतिनिधी/ सातारा

खासदार उदयनराजे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची दोन दिवसापूर्वी भेट घेवून भाजपात जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अचानक यु टर्न घेत चक्क शुक्रवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचे आणि भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमात झळकले. सातारा शहरातही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेशाचे फ्लेक्स लावले गेले आहेत. तसेच दुपारी त्यांनी चक्क ट्विटरवरुन भाजपात चालल्याची भूमिका मांडली. परंतु दुसरी शंका म्हणजे ते साधा मोबाईल वापरतात, अशी चर्चा सुरु आहे.

खासदार उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीत तुफानी भाषणबाजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्याच्या आजही क्लिपा फिरत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रचारातील मुद्दे हे देश आंतरराष्ट्रीय पातळीवरचे होते. स्थानिक पातळीवरचे काहीच मुद्दे नव्हते. खासदार उदयनराजे यांच्या मनात काय चालले आहे हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही कधी सापडले नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून खासदार उदयनराजे हे भाजपामध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. मीडियातूनही जोरदार वादळ उठले होते. साताऱयात शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादीची आली तेव्हाही यात्रेत कुठेही फिरकले नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचा फोटो कुठेही लावला नव्हता. खासदार उदयनराजे यांच्या मनवण्यासाठी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱयात येवून प्रयत्न केले. त्यावेळीही त्यांनी मीडियाशी संदिग्ध उत्तरे देवून मनात काय आहे हे मात्र कळू दिले नाहीत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तेव्हा राष्ट्रवादीतच राहणार अशी काहीशी भूमिका मीडियाने प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतर अचानकपणे खासदार उदयनराजेंनीच कार्यकर्त्यांना फोनवरुन सूचना केल्या की, राजीनामा देतोय, कामाला लागा, कार्यकर्तेही बाह्या सारुन कामाला लागले. खासदार उदयनराजेंनी आपला राजीनामा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी झळवले. तर काही माध्यमांनी चक्क उदयनराजे उद्या प्रवेश करणार असल्याचे झळकवले. खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र सातारा शहरात भाजपा प्रवेशाचे आणि महाजनादेश यात्रेचे फ्लेक्सही लावले. सोशल मीडियावर भाजपा प्रवेशाचे नारे घुमू लागले आहेत. त्यामुळे अखेर खासदार उदयनराजे यांचे भाजपामध्ये जाण्याचे निश्चित झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसात त्याबाबत आणखी काही घडामोडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे यांच्यासोबत जवळचा कार्यकर्ता कोण आहे हेही रात्री उशिरापर्यंत समजत नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबतची खात्रीशीर माहिती अधिकृत समजली नाही.

Related posts: