|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीला दणका; उदयनराजे भाजपात

राष्ट्रवादीला दणका; उदयनराजे भाजपात 

दिल्ली येथे अमित शहा व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

प्रतिनिधी/ सातारा

शिवसेना-भाजपात मेगा भरती होत असताना खासदार उदयनराजेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना सुरुवात झाली. उदयनराजेंच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठीमुळे प्रवेश कधी होणार?, होणार की नाही? असे तर्कवितर्क लढवले जात असताना अखेर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. व शनिवारी सकाळी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हाती घेतले. यावेळी खासदार उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मोदी, शाह यांचे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कार्य करत आहेत, असेही त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

  उदयनराजे यांनी राजीनामा शुक्रवारी रात्री सव्वा वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जावून सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. सकाळी अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे म्हणाले, काश्मिरमधील कलम 370 हटवण्याचे धाडस मोदींनी दाखवले आहे. माझ्या लहानपणापासून काश्मीर प्रश्नाबद्दल ऐकत होतो. पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हते. पण मोदींनी ते धाडस दाखवले. मोदी-शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कार्य करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो आदर्श लोकशाहीसारखा होता. त्यांच अष्टमंडळ होत. त्याचाच आधार घेवून भारतात लोकशाही प्रक्रिया सुरु आहे. या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात भाजप करत आहे. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेवून जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपाशी जोडले जाण्यास इच्छुक आहे. त्यामागे हेच कारण आहे, असे सांगत त्यांनी पुढे, कोंडमारा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. मी जरी खासदार म्हणून निवडून आलो होतो तरी माझे मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे तेव्हापासून मी अस्वस्थ होतो. माझ्या मतदारसंघाचा मला विकास करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझा कोंडमारा होत होता. त्यामुळे सगळय़ांना सांगून मी पक्षाचा त्याग केला आहे. पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, माझे नाव माहित आहे का तुम्हाला?, काय नाव माझे, असे उदयनराजेंनीच उत्तर देवून म्हणाले मी कुठलीही गोष्ट लपूनछपून करत नाही. जे करतो ते उघडपणे करतो. त्यामुळे सगळय़ांना सांगून मी पक्षांतर केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हय़ाच्या राजकारणावर मोठा परिणाम

भाजपमध्ये सुरू असणारी मेगा भरतीमध्ये उदयनराजेंचाही समावेश झाल्यामुळे जिल्हय़ाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदार पदाचा राजीनामा देत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे सातारा पालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषदेसह अनेक सत्ताकेंद्रामध्ये बदल होणार आहे. तर विधानसभा निवडणुकीतही मोठा परिणाम दिसून येणार आहे.

Related posts: