|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » युद्धापूर्वीच शरणागती

युद्धापूर्वीच शरणागती 

भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तानचा पराभव अटळ : पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

काश्मीरच्या मुद्यावर भारताशी तणावाचे संबंध कायम असून दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास पाकिस्तानला पराभव पत्करावा लागेल, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची भाषा करत या सर्वांचे परिणाम भयानक असतील असेही म्हटले आहे.  भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकते का? दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये मोठा संघर्ष उद्भवण्याची शक्मयता आहे काय? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. ‘अल जजीरा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.

भारताने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने जगातील प्रत्येक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित केला. पण पाकिस्तानला कोणत्याही देशाने दाद दिलेली नसल्याने अखेर आता नरमाईची भूमिका येऊ लागली आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे नाकारत येत नाही असे इम्रान खान यांनी मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानकडे केवळ आत्मसमर्पण करणे किंवा शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहणे असे दोनच पर्याय असतील, असेही त्यांनी सांगितले. युद्ध झाल्यास पाकिस्तान शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्णय घेईल. तसेच स्वतःकडील अण्वस्त्रांचाही वापर करेल, असेही ते म्हणाले.

युद्धजन्य परिस्थितीत एखादा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या क्षणापर्यंत लढत असल्यास त्याचे परिणाम भयावह असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे आताच आम्ही संयुक्त राष्ट्रासह प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघनटेशी संपर्क साधत आहोत, असेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले.

काश्मीरप्रश्नी भारतावर आरोप

पाकिस्तानचे चीनशी अगदी जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. पण काश्मीरच्या मुद्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणल्याचे सांगत भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला. काश्मीरमध्ये गेल्या सहा आठवडय़ांपासून 80 लाख मुस्लीम कैदेत आहेत. पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करून भारत जगाचे लक्ष या मुद्यावरून विचलित करत आहे. पाकिस्तान स्वत:हून कधीच युद्धाची सुरुवात करणार नाही. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. मी शांतताप्रिय माणूस आहे. मला युद्ध आवडत नाही. युद्ध कोणत्याच समस्येचे अंतिम उत्तर ठरू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानला दिवाळखोर बनवण्याचे प्रयत्न

आम्ही भारताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण भारताने आम्हाला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या काळय़ा यादीत टाकण्याचे प्रयत्न केले. पाकिस्तानचा काळय़ा यादीत समावेश झाला असता तर आमच्यावर अनेक निर्बंध लागले असते. भारत आम्हाला दिवाळखोर घोषित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे भारताकडून उल्लंघन

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील प्रस्तावाविरोधात जात अनुच्छेद 370 रद्द करत बेकायदेशीररित्या काश्मिरचा स्वायत्त दर्जा संपुष्टात आणला आहे. या प्रस्तावात काश्मीरमध्ये जनमत घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे, असेही इम्रान खान म्हणाले.

अफगाणिस्तानमधील भूमिका

कट्टरपंथीयांना पाकिस्तान आश्रय देत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी फेटाळून लावला. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अमेरिकेदरम्यानची शांतताविषयक चर्चा रद्द झाल्याबद्दल इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, अशीच पाकिस्तानची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: