|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जनतेच्या साक्षीनेच भाजपात प्रवेश करणार

जनतेच्या साक्षीनेच भाजपात प्रवेश करणार 

सत्यजित देशमुख यांची माहिती : शिराळा तालुक्यात काँग्रेसची अवस्था दयनीय

प्रतिनिधी/ शिराळा

     काँग्रेसने नेहमी कार्यकर्त्यांना कमी लेखून राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासाठी आमचा बळी दिला. यापूर्वी राष्ट्रीय पक्षात होतो. आता शिराळा तसेच वाळवा तालुक्यातील जनसमुदायाच्या साक्षीने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कासेगाव येथे जाहीर प्रवेश कार्यक्रम होणार आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादी यांची ताकत कमी झाली आहे. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्यावर सभापती असताना अविश्वास ठराव राष्ट्रवादी काँग्रेसने आणला होता. त्यावेळी मानसिंगराव नाईक व जयंतराव पाटील कुठे गेले होते? असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले.

      शिराळा येथे विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिराळा तालुक्यातील व वाळवा तालुक्यातील 48 गावातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

    सत्यजित देशमुख म्हणाले, सध्या काँग्रेस पक्षातील ज्येष्ठांकडून शिराळा तालुक्यातील देशमुख घराण्यातील निष्ठावान लोकांना डावलले जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाणयाचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची शकले झाली आहेत. आज आम्ही जुने घर पाडावयाचे ठरवले असून नवीन मोठे घर बांधणार आहे.

शिराळा तालुक्यात काँग्रेस दयनीय

काँग्रेसचा सदस्यत्व व सरचिटणीस, जि. प. सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता देशमुख साहेब यांचे विचार घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी केली आहे. देशमुख साहेबांनी कधी कुणाला आपला परका अशी दुजाभावाची वागणूक दिली नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. अजातशत्रू असणारे देशमुख साहेब कर्तृत्ववान नेते होते. अशा नेत्याच्या पदाबाबत राष्ट्रवादीने सभापती काळात अविश्वास ठराव आणून गद्दारी केली. यावेळी जयंतराव पाटील व मानसिंगराव नाईक कुठे गेले होते. त्यांनी यासंदर्भात चकार शब्दही काढला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अशी राजकारणातील तिरकस चाल करण्यात अग्रेसर राहिला आहे. त्यांच्या चालीत चाल मिसळण्यात काँग्रेस सोबत राहिला आहे. असे करत असताना काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावला जातो आहे. याबाबत काँग्रेस आणि काँग्रेसमधील जेष्ठांनी कधीही विचार केला नाही. आजपर्यंत अनेक गोष्टींच्या बाबतीत आम्ही अन्याय सहन केला आहे.

काँग्रेसकडून झोपेचे सोंग

राज्यासह जिल्हात काँग्रेसची पीछेहाट होत असताना शिराळा मतदार संघात  शिवाजीराव देशमुख व सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस अबाधित ठेवण्याचे काम केले होते. या मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. असे असताना देखील काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे आमचे नेते सत्यजित देशमुख यांनी भाजपा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मत सुजित देशमुख, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती, शिराळा यांनी व्यक्त केले.

भाजपा प्रवेशाचे निमंत्रण

   कासेगाव येथे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यक्रमात भाजपा प्रवेशाचे निमंत्रण देऊन स्वागत करण्यासाठी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक हे मेळाव्यात उपस्थित राहिले होते.

Related posts: