|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महाजनादेश यात्रा आज जिल्हय़ात

महाजनादेश यात्रा आज जिल्हय़ात 

वातावरण भाजपामय : जोरदार स्वागताची तयारी

प्रतिनिधी/ सांगली

 भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्हय़ात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्याची जोरदार तयारी भाजपाने केली आहे. सोमवारी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस सांगलीत दाखल होत असून शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हय़ात इस्लामपूर, पलूस, तासगाव आणि सांगलीत अशा चार सभा होणार आहेत. त्यानिमीत्ताने शक्तीप्रदर्शनाची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. सांगलीत दुपारी तीन वाजता पुष्पराज चौकात सभा होणार आहे.

  राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांचे लाभ मिळाले आहेत. मोफत गॅस, घरासाठी मोफत वीज जोडणी, रूग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ, घरे सदनिकासाठी रोख अनुदान, जनआरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना आदी सुरू करण्यात आल्या आहेत.  या योजनांचा लाभ मिळालेल्या सांगलीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष आ.सुधीर गाडगीळ यांनी केले आहे.

 कुमठे फाटा, मिशन हॉस्पीटलमार्गे महाजनादेश यात्रा सांगलीकडे येणार आहे. सांगली मिरज रोडवरील संजय भोकरे कॉलेजजवळ आ. सुधीर गाडगीळ मुख्यमंत्री फडणवीस आणि महाजनादेश यात्रेचे स्वागत करणार आहेत. तेथून दुचाकींची रॅली काढण्यात येणार असून विजयनगर चौक येथे धनगर समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येईल. विश्रामबाग चौक,  पुष्पराज चौक येथे महाजनादेश यात्रेची स्वागत सभा होणार आहे. त्यानंतर राममंदिर चौक,  सिव्हिल हॉस्पिटल चौक, शास्त्राr चौक मार्गे अंकली फाटा येथे महाजनादेश यात्रा कोल्हापूर जिल्हय़ात प्रवेशकर्ती होणार आहे. यात्रेच्या संपूर्ण मार्गावर भाजपाचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. यात्रा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे.

 सोमवारी सकाळी शिराळा विधानसभा मतदारसंघातून या महाजनादेश यात्रेस जिल्हय़ात सुरूवात होईल. कासेगाव येथे आगमन झाल्यानंतर आ. शिवाजीराव नाईक स्वागत करतील. त्यानंतर पेठ नाका येथे  राहुल महाडिक यांचे स्वागत स्विकारून यात्रा इस्लामपूर मतदार संघात प्रवेश करेल. इस्लामपूर प्रशासकीय इमारत सामोरील चौकात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वागत करतील. कचेरी चौकात मुख्यमंत्र्यांची स्वागत सभा होईल.

 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात तुपारी फाटा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख स्वागत करून यात्रेत सहभागी होतील. पलूसमधील  किर्लोस्कर विदयामंदिर क्रीडांगण येथे जाहीर सभा होणार आहे. सुरेंद्र चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे संयोजन करण्यात आले आहे. तासगाव-क.महांकाळ विधानसभा मतदारसंघात येळावी येथे खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे स्वागत करतील. तासगाव शहर कॉलेज कॉर्नरवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक सभा होईल. मिरज विधानसभा मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे मिशन हॉस्पिटल चौकात स्वागत करून यात्रेत सहभागी होतील. भोकरे कॉलेज सांगली-मिरज रोड येथे आ. सुधीर गाडगीळ सांगली विधानसभा मतदार संघात स्वागत करतील, अशी माहिती महाजनादेश यात्रेचे दिनप्रमुख मकरंद देशपांडे यांनी दिली.

Related posts: