|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सातवी पास तरूणाने बनविल्या बनावट नोटा

सातवी पास तरूणाने बनविल्या बनावट नोटा 

प्रतिनिधी / पंढरपूर

शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱया दिवशी एक संशयित तरूण पोलिसांना आढळून आला. या तरूणांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी सदरचा तरूण हा बनावट नोट तयार करत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हा तरूण सातवी पास असून युटय़ुबचा व्हिडीओ पाहून त्याने नोटा तयार केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गावडे म्हणाले, माळशिरस तालुक्यातील पिलीव जवळील कुसमुड येथील रणजित सुखदेव राजगे या बावीस वर्षीय तरूणाने बनावट नोटा तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे युटय़ुब वरील एक व्हिडीओ पाहून सदरच्या नोटा रणजितने तयार केल्या आहेत. तसेच या नोटा तयार करून त्या बाजारात खपविण्यासाठी एका मुलीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट देखिल या तरूणाने तयार केले. आणि या अकाउंंटच्या माध्यमातून नोटा खपविण्यासाठी अनेकांशी संपर्क देखिल केला आहे.

गणेश विसर्जनाच्या दुसऱया दिवशी सदरचा तरूण कॉलेज चौकात आढळून आला. यानंतर या तरूणाची पोलिसांनी चौकशी केली. तसेच सदरच्या तरूणाच्या घराची देखिल झडती घेतली. यामध्ये अकरा हजार रूपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तसेच तपासामध्ये यापूर्वी या तरूणाने दोन लाखाच्या बनावट नोटा तयार करून जाळून देखिल टाकल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच बरोबर नोटा बनविणाऱया प्रिंटरसह 2 मोबाईल आणि 14 सिमकार्ड देखिल पोलिसांना मिळाली आहे. रणजित राजगे याच्या वडिलांचे पिलीव नजीक सराफ्ढ दुकान आहे. त्यामुळे सावकारीच्या माध्यमातून बनावट नोटा बाजारात देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे करीत आहेत.

 

Related posts: