|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापुराचे पाणी दुष्काळीभागाकडे वळवू : मुख्यमंत्री

महापुराचे पाणी दुष्काळीभागाकडे वळवू : मुख्यमंत्री 

प्रतिनिधी/ सांगली

महापुराने सांगलीकरांचे फार मोठे नुकसान झाले. आगामी काळात हे नुकसान होऊ नये यासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाला बंदिस्त पाईपव्दारे नेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांच्यावर  हल्लाबोल करताना विरोधकांच्याकडे आता विधानसभेची कुस्ती खेळण्यास पैलवानच नसल्याची वल्गनाही त्यांनी केली.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचे सांगली जिल्हय़ात भव्य आणि दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्यावर पुष्पवृष्टी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीत पुष्पराज चौकात झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख, शेखर इनामदार, सौ. नीता केळकर, महापौर सौ. संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

2005 च्या महापुरापेक्षा अधिक पटीने मदत

फडणवीस म्हणाले, महापुरामुळे सांगलीतील कृष्णा आणि वारणाकाठच्या लोकांचे फार मोठे नुकसान झाले. आगामी काळात हा महापूर आल्यानंतर त्यांचे नुकसान होवू नये यासाठी हे महापुराचे पाणी जागतिक बँकेच्या मदतीने बंदिस्त पाईपव्दारे जिल्हय़ातील संपूर्ण दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्हय़ातील महापुराचा त्रास कमी होणार आहे. तसेच दुष्काळी असणारा भाग या पाण्यामुळे सुकाळी होणार आहे. या योजनेसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. महापूराने मोठे नुकसान केले असले तरी पण सरकारने महापूरग्रस्तांना तातडीने आणि सन 2005 च्या महापुराच्या मदतीपेक्षा मोठय़ाप्रमाणात मदत दिली आहे. कारण हे सरकार जनतेच्या हितासाठी असणारे आहे. जनतेची दुःखे या सरकारला समजतात म्हणून तर हे सरकार तुमच्यासाठी लागलीच धावून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

संवाद साधण्यासाठी आलो

महाजनादेश यात्रा ही जनतेची गाऱहाणी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी काढली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी आहे. ही जनताच आमची दैवत आहे. जनतेच्या हिताचा आम्ही कारभार गेल्या पाच वर्षात केला आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे जाणून घेण्यासाठी ही संवाद यात्रा सुरू केली आहे. या संवाद यात्रेतून आतापर्यंत तीन हजार किमीचा प्रवास आपण केला आहे. लोकांच्यामध्ये भाजपा बद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारवर जनता फिदा आहे. त्याप्रमाणेच राज्यातील सरकारवरही ही जनता खुश असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांकडे लढण्यास पैलवानच नाहीत

आम्ही ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर लोकांनी आम्हाला सांगितले की तुमचे काम चांगले आहे आणि तुम्हीच निवडून येणार आहे. कशाला ही यात्रा काढता. विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तुमच्यासोबत लढण्यासाठी पैलवानच उरले नाहीत. तुमच्या पैलवानांचा म्हणजेच तुमच्या उमेदवारांचा विजय निश्चित  होणार आहे. आता जनताच म्हणते विरोधकांच्याकडे पैलवान नाही इतकी केविलवाणी अवस्था विरोधकांची झाली आहे.

मोठा हार घालून स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आणि त्यांना मोठा हार घालून करण्यात आले. महाजनादेश यात्रा ज्या वाहनावरून काढण्यात आली होती त्य़ा वाहनावरूनच त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. हा संवाद साधल्यानंतर काही लहानमुलांनी त्यांना गुलाब फुले दिली. त्या फुलांचा स्विकार करत त्यांनी या मुलांना त्यांच्याकडील फुले देत त्यांचे कौतुक केले.

Related posts: